जोगेश्वरी भूखंड घोटाळा दोषींवर होणार कठोर कारवाई, पालिका आयुक्तांची ग्वाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

चौकशीत दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आज स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. या प्रकरणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : जोगेश्वरी येथील पाचशे कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचा चौकशी अहवाल येत्या आठ ते दहा दिवसांत सादर केला जाईल. चौकशीत दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आज स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. या प्रकरणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जोगेश्वरीच्या मजास वाडीतील 13 हजार 674 चौरस फूटांचा आणि तब्बल 500 कोटींचा भूखंड पालिकेच्या विधी आणि विकास नियोजन खात्यामधील अधिकाऱ्यांनी अफरातफर करून बिल्डरच्या घशात घातल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. आयुक्त मेहता यांनी स्थायी समितीत उपस्थित राहून या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले. नियमानुसार हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी जमीन मालकाने 2014 मध्ये खरेदी नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीत ही जागा पालिकेने ताब्यात घेणे अपेक्षित होते. मात्र हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे जमीन मालकाने न्यायालयात केलेल्या दाव्यानंतर पालिकेने बाजू मांडण्यास विलंब केल्याने ही जागा पालिकेच्या ताब्यातून गेली असल्याचे सांगून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. यावर आयुक्त मेहता यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत येत्या आठ - ते दहा दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करून तो जाहिर केला जाईल. यांत दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्याविरूध्द कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

हस्ताक्षरात फेरफार झाल्याची आयुक्तांची कबूली :
जोगेश्‍वरी भुखंड प्रकरणी माझ्या हस्ताक्षरात फेरफार केली आहे, अशी कबूली पालिका आयुक्त मेहता यांनी दिली. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर दोषींविरूध्द कारवाई करण्यासाठी मी पाऊले उचलली. मात्र असे असताना माझ्या विरोधातच काही व्यक्तींनी सिव्हील कोर्टात याचिका दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली, याचे वाईट वाटते. भूखंड परत मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयांत पुन्हा दाद मागितली जाईल. त्यासाठी नामांकित वकीलांशी चर्चा सुरु आहे. हा भूखंड आम्ही परत मिळवू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

चौकशी निधी चौधरी यांच्याकडे :
निवृत्त न्यायाधिशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीला आयुक्तांनी फाटा दिला. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्या मार्फत निःपक्षपाती चौकशी केली जाईल. रस्ते, नालेसफाई कामांतील घोटाळ्यात मोठी कारवाई केली. यावेळीही माझ्यावर विश्वास ठेवा, असा विश्‍वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सील करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rigorous action will be taken against Jogeshwari plot fraud says municipal commissioner