माणगावच्‍या रिळे शाळेतील विद्यार्थी गिरवणार टॅबवर धडे

माणगाव : रिळे शाळेस टॅब वितरण करताना अनय जोगळेकर, विद्यार्थी व मान्यवर.
माणगाव : रिळे शाळेस टॅब वितरण करताना अनय जोगळेकर, विद्यार्थी व मान्यवर.

माणगाव (बातमीदार) : ज्ञानरचनावादी उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात बदल घडवणाऱ्या रिळे शाळेला चार टॅब देणगीतून मिळाले आहेत. या टॅबच्या मदतीने शाळेतील विद्यार्थी आता अभ्यासाचे धडे गिरवत आहेत.

रिळे शाळा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेतील विद्यार्थी अनेक उपक्रमांत सहभागी होऊन ज्ञान संपादन करत असतात. या शाळेस नेहमी मदत करणाऱ्या अनय जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चार टॅब देणगीतून दिले आहेत. शाळेला नेहमीच आर्थिक व भौतिक मदत करणारे इस्त्राईल दूतावासात राजकीय संबंध आणि विशेष प्रकल्प अधिकारी, चिकित्सक राजकीय विश्‍लेषक असलेले अनय जोगळेकर यांनी प्रत्येक वर्गाला एक असे एकूण चार टॅब भेट दिले आहेत. यापूर्वीही त्यांनी शाळेला कपाट, ग्रंथालय, टीव्ही, प्रोजेक्‍टर इत्यादींची मदत केली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून ते प्रभावित झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात कुठेही कमी नाहीत हे पाहून शाळा भेटीत त्यांना अतिशय आनंद झाला. विद्यार्थ्यांनी त्यांना डाव्या हाताने लेखन, वैदिक गणित, चिमण्यांची शाळा, तोंडी अचूक बेरीज वजाबाकी करून दाखवली. यापुढेही शाळेला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

टॅब वितरणप्रसंगी नीता अनय जोगळेकर, शाळेचे अध्यक्ष मनाली म्हसकर, उपाध्यक्ष विनोद खिडबीडे, मुख्याध्यापक वर्षा शेळके, उपक्रमशील शिक्षिका उज्ज्वला मस्के उपस्थित होत्या. शाळेस मिळालेल्या टॅबमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक आनंदित झाले असून, शाळेची शैक्षणिक प्रगती आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील आमची शाळा उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम आम्ही राबवतो. विद्यार्थी, पालक व समाजाचा सर्व उपक्रमांत पाठिंबा व सहभाग असतो. शाळेला मिळालेल्या या टॅबमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शैक्षणिक प्रगती होण्यास निश्‍चित मदत होईल.
- उज्ज्वला मस्के, उपक्रमशील शिक्षिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com