विधी अभ्यासक्रमासाठी आजपासून अर्ज; सीईटी सेलकडून अखेर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (ता. 25) 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 3 सप्टेंबरला दुपारी तीनला जाहीर होईल.

मुंबई - तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (ता. 25) 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 3 सप्टेंबरला दुपारी तीनला जाहीर होईल. 

राज्यातील विधी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी सीईटी सेलने घेतलेल्या परीक्षेला 36 हजार 513 विद्यार्थी बसले होते. या प्रवेश परीक्षेचा निकाल 17 जूनला जाहीर झाला होता. मुंबई विद्यापीठाचे अनेक निकाल रखडल्यामुळे सीईटी सेलने प्रवेश प्रक्रिया सुरू केली नसल्याने विद्यार्थ्यांना फेऱ्या माराव्या लागत होत्या. अखेर सीईटी सेलने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना 25 जुलै ते 5 ऑगस्ट या काळात अर्ज आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील. 

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी 16 ऑगस्टला जाहीर होईल. या यादीत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना 17 ते 20 ऑगस्ट या काळात ऑनलाइन हरकती नोंदविता येतील. अंतिम गुणवत्ता यादी 26 ऑगस्टला जाहीर होईल. 

पहिली गुणवत्ता यादी 3 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार प्रवेश निश्‍चित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन 4 ते 7 सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. दुसरी गुणवत्ता यादी 16 सप्टेंबरला, तर तिसरी गुणवत्ता यादी 7 ऑक्‍टोबरला जाहीर होईल. 

महाविद्यालयीन स्तरावर 15 ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान प्रवेश अर्ज भरून घेण्यात येतील. या प्रक्रियेची गुणवत्ता यादी 19 ऑक्‍टोबरला सकाळी 11 वाजता जाहीर होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritual Courses form CET Cell finally announced admission schedule