अंबा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुंबई :  सुधागड तालुक्‍यात शनिवारी अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्‍याची पातळी ओलांडली. त्यामुळे शनिवारी रात्री व रविवारी (ता.4) वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभूळपाडा पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

मुंबई :  सुधागड तालुक्‍यात शनिवारी अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्‍याची पातळी ओलांडली. त्यामुळे शनिवारी रात्री व रविवारी (ता.4) वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभूळपाडा पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

जांभूळपाडा गावात काही ठिकाणी पाणी शिरले होते. तसेच पालीजवळ भाग्यश्री प्लाझाजवळ पाणी आले होते. तर पाली आणि बलाप येथील काही घरात पाणी शिरले होते. रात्रीपासूनच जांभूळपाडा व पालीसह नदीकिनाऱ्यावरील अनेक गावातील रहिवासी पूर येण्याच्या भीतीने जागे होते. 

सुधागड तालुक्‍यात प्रशासनाकडून देखील नागरिकांना व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पहाटेपासूनच पालीसह अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वाकण फाट्यावर, पाली व जांभूळपाडा अंबा नदी पूल येथे पोलिस तैनात करण्यात आले होते. पुलावरून पाणी गेल्याने वाहनचालकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. 

पाली व जांभूळपाडा पुलावरून पाणी गेल्याने पोलिसांनी वाकणहून खोपोलीकडे जाणारी व खोपोली - पाली - वाकणकडे होणारी वाहतूक बंद केली होती. याबरोबरच नांदगाव व शिळोशी येथील पुलावरून देखील पाणी गेले होते. येथील टेंबी वसाहतीजवळ पाणी आले होते. वावे गावातील भैरीनाथ मंदिर अर्धे पाण्याखाली गेले होते.

उन्हेरे फाटा ते उद्धर रस्ता पाण्याखाली होता. पाली - खोपोली मार्गावर आंबोले गावाजवळ व गिर आंबा येथे देखील रस्ता पाण्याखाली गेला होता. नदी किनाऱ्यावरील संपूर्ण शेती पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यावर संकट आले आहे. रात्रभर तालुक्‍यातील ग्रामस्थ व्हॉटसपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. आणि पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत होते. 

मुसळधार पावसामुळे पालीतील नाले व गटारे तुडूंब भरून वाहत होते. त्यामुळे येथील आगर आळी, सोनार आळी, भोईआळी, बल्लाळेश्वर नगर आदी ठिकाणी रस्त्यावरून पाणी गेले होते. सोनार आळीतील काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरले होते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. 

वाकण - पाली - खोपोली मार्ग बंद 
पाली व जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील पुलांची उंची कमी आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वाढून दरवर्षी या पुलांवरून पाणी जाते. या मार्गावर आंबोले, गिर आंबा, वाकण आदी ठिकाणी देखील पाणी साठते. त्यामुळे वारंवार येथील वाहतूक ठप्प होते. या पावसाळ्यात येथील वाहतूक ठप्प होण्याची सहावी वेळ आहे. परिणामी येथील ग्रामस्थांना व प्रवाश्‍यांना हकनाक याचा सामना करावा लागत आहे. तसेच व्यापाऱ्यांचा माल, दूध, वर्तमानपत्र, भाजी व औषधे हे सर्व वस्तू घेऊन येणारी वाहने अडकून पडतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The river Amba crossed the danger level