नद्यांचा रूबाब बदलला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

अनेक लहान-मोठ्या गावांमध्येही नद्यांचे पाणी शिरले होते. जिल्ह्यातील बहुसंख्य गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेच; परंतु व्यापारी आणि सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

महाड : धुवांधार पावसानंतर रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या बेफाम झाल्या होत्या. त्यात शकाडोंचे संसार उघड्यावर आले. कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. पावसाने उसंत घेतल्यानंतर त्या आता थंडावल्या असून जणू काही घडलेच नाही, अशा थाटात संथपणे वाहू लागल्या आहेत. 

नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी त्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला आहे. काही ठिकाणी या नद्यांमध्ये मासेमारीही सुरू केली आहे. 

पावसाने गेल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये अक्षरश: थैमान घातले होते. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली. सावित्री, अंबा, कुंडलिका, उल्हास या प्रमुख नद्यांना पूर आला होता. महाड, नागोठणे या शहरांमध्ये पुराने तर धुमाकूळ घातला. वाहतूक सेवा कोलमडली. 

अनेक लहान-मोठ्या गावांमध्येही नद्यांचे पाणी शिरले होते. जिल्ह्यातील बहुसंख्य गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेच; परंतु व्यापारी आणि सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

नद्यांनी चार दिवस रुद्रावतार घेतला होता. त्यामुळे भल्याभल्यांना धडकी भरली; परंतु आता त्या शांत झाल्या आहेत. त्यांच्या पाण्याची पातळीही झपाट्याने उतरली आहे. 

पूर आल्यानंतर नद्यांची इशारा पातळी आणि त्यानंतर धोक्‍याची पातळी अशी प्रमुख पातळ्या असतात; परंतु आता त्या इशारा पातळीपेक्षाही खूप कमी स्तरावरून वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांमधून गाळही दिसू लागलेला आहे. 

रायगड पाटबंधारे विभागाने काल दुपारी दोन वाजता घेतलेल्या पातळी अहवालानुसार नद्या सर्वसाधारण पातळीवर आल्या आहेत. नदीकाठी मासेमारीही सुरू झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rivers calm