रायगड जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; पावसाचा जोर कायम

रायगडमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; पावसाचा जोर कायम
रायगडमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; पावसाचा जोर कायम

अलिबाग : तीन दिवस सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूपात भासणारी जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. भात लावणीच्या कामानेही वेग घेतला असल्याने येथील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

रविवार (ता. 5) सकाळपर्यंत चोवीस तासांत 20.77 मिमीच्या सरासरीने पाऊस पडला. पावसाची सर्वाधिक नोंद पोलादपूर (97 मिमी) तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्याने येथील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. पुढील चार ते पाच दिवस कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

माणगाव, रोहा तालुक्यात पडलेल्या पावसाने कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातील पाण्याची पातळी 22.75 मीटर इतकी वाढली आहे. येथील धोका पातळी 23.95 मीटर इतकी असल्याने वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीवर पाटबंधारे विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून असल्याची माहिती पूरनियंत्रक अधिकारी सतीश शेळके यांनी दिली आहे. जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे काही प्रमाणात मागील दोन महिने गंभीर स्वरूपात जाणवणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. श्रीवर्धन, तळा, माणगाव या तालुक्यांमध्ये निसर्ग वादळात विस्कळित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे येथे पंपाद्वारे चालणाऱ्या पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. 

जिल्ह्यातील नद्यांची पातळी
नद्या                                           धोका पातळी(मीटर)               दु. 2.00 वाजताची पातळी
अंबा नदी (नागोठणे)                             9.00                                        6.35
सावित्री (भोईघाट)                                 6.50                                       3.40
पाताळगंगा (लाहोप-खालापूर)                 21.52                                      18.40
उल्हास (दहिवली- कर्जत)                      48.77                                      45.00
गाढी नदी (शासकीय विश्रामगृह- पनवेल)   6.55                                        2.40

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com