Video : बेलगाम चालक हेच खरे मृत्युदूत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

चारचाकीमुळे पादचाऱ्यांच्या बळी 
१५ ते ४४ वयोगटातील २७४ जणांचा मृत्यू 
दारूमुळे १५ जणांचा मृत्यू

मुंबई - देशातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, त्यांवरील खड्डे, वाकडीतिकडी वळणे यामुळे रस्ते अपघात होतात, त्यात अनेकांचे बळी जातात असा लोकप्रिय समज असला, तरी यासंबंधात झालेल्या संशोधनातून वेगळेच वास्तव समोर आले आहे. रस्तेअपघातांस रस्त्यांची अवस्था किरकोळ प्रमाणात कारणीभूत असून, ७४ टक्के अपघात हे बेलगाम चालकांमुळे होत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

‘वर्ल्ड इकॉनॉनिक फोरम’च्या रस्त्यांच्या दर्जाविषयक अहवालानुसार भारतातील रस्त्यांचा दर्जा चांगलाच सुधारला आहे. रस्त्यांच्या दर्जानुसार, जागतिक पातळीवर २००९ साली भारताचा क्रमांक ८८वा होता. तो २०१९ मध्ये ५५ व्या स्थानी आला आहे. देशातील रस्ते सुधारले असले, तरी अपघातांचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी झालेले नाही. याबाबत विचारले असता, रस्तेअपघातांत वाहनचालकांची मोठी चूक असल्याचे राज्य महामार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. चालक प्रशिक्षित नसणे, त्याने वाहतुकीचे नियम न पाळणे, शहरी भागांत सिग्नल न पाळणे, सीटबेल्ट न लावणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालणे अशी अपघातांची विविध कारणे असून, बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होतात, असे ते म्हणाले. तर राज्याच्या परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने याबाबत काही प्रमाणात रस्त्यांची दूरवस्था, अवघड वळणे यांना दोष देतानाच वाहनचालकाने मर्यादीत वेग ठेवला तर हे अपघातही टाळता येतात, असे सांगितले. 

शांघायमध्ये २०१६ मध्ये झालेल्या जागतिक वाहतूक संशोधन परिषदेत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट - लखनौ’तर्फे सादर करण्यात आलेल्या एका शोधनिबंधानेही यास दुजोरा दिला आहे. ‘भारतातील रस्ते वाहतूक अपघात - समस्या आणि आव्हाने’ असे त्याचे शीर्षक असून, आयएमएममधील प्रा. संजयकुमार सिंह हे त्याचे लेखक आहेत. त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ३० ते ५९  या वयोगटातील लोकांचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. आर्थिकदृष्ट्या कार्यरत असलेल्या या गटातील व्यक्ती मृत्यूमुखी पडणे हे देशाच्या मानवी साधनसंपत्तीचे मोठेच नुकसान आहे. 

एकंदर ७४ टक्के  रस्तेअपघात चालकांच्या चुकीमुळे होत असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे असले, तरी प्रा. संजयकुमार यांच्या अभ्यासानुसार हे प्रमाण ७८ टक्के आहे. या तुलनेत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणा-या अपघातांचे प्रमाण अगदीच किरकोळ म्हणजे १.४ टक्के आहे. 

चालकांच्या चुकांमध्ये निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन हे अपघातांस सर्वाधिक (५५.६ टक्के) जबाबदार असून, मद्यप्राशन व अंमली पदार्थांच्या सेवनामुळे ५.३ आणि ६.४ टक्के अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. वाहनाच्या क्षमतेहून अधिक प्रवासी नेणे वा अधिक वजनाचा माल नेणे यामुळे १९.६ टक्के अपघात होतात असेही या शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road accidents cause road conditions