
Mumbai News : खड्ड्यां नंतर आता रस्त्यांची धुळधाण...
डोंबिवली - रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना रस्त्यावरुन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. आता शहरात बहुतांश रस्त्यांचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे. या कामांमुळे चालकांची कसरत कमी झाली असली तरी या कामांमुळे रस्त्यांची धुळधाण झाली आहे.
त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून ही धूळ नाका तोंडात जात असल्याने नागरिकांनी संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. चालक, प्रवासी यांसह आसपासच्या रहिवाशांनाही याचा त्रास जाणवत असून कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर सध्या हेच चित्र आहे.
कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांंमुळे गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे. रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला असून काही रस्त्यांच्या कामास सुरुवात देखील झाली आहे. मात्र ही कामे अत्यंत संथ गतीने सुरु असल्याचे दिसते.
रस्त्यांची कामे सुरु असल्याने सर्वत्र सीमेंट, खडी, मातीचा पसारा पडलेला आहे. रस्त्यांची कामे सुरु असल्याने वाहन चालकांना चांगले रस्ते लवकरच मिळतील याचा दिलासा मिळत असला तरी सध्याच्या घडीला रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाचा तडाका वाढला असून हे सीमेंट, माती ही वारा व वाहनांमुळे हवेत पसरत आहे.
त्यातही अवजड वाहनांनी प्रवास केल्यानंतर ही माती मोठ्या प्रमाणात उडते आहे. या धुळीने दुचाकी, रिक्षाचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मास्क शिवाय प्रवास करणे अशक्य झाले आहे. तसेच दुचाकी, सायकलवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या कपड्यांवर धुळीचा थर साचलेला दिसून येतो.
या धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, घसा बसणे असे त्रास सुरु झाले आहेत. हा खोकला, सर्दी ही तीन ते चार दिवसांत बरी होत नसून दहा पंधरा दिवस रहाते. तर काहींना त्वचेचे विकार देखील जडत आहेत. सातत्याने धुळीतून प्रवास करावा लागत असल्याने हे विषाणूजन्य आजार बरे तरे कसे होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रस्त्यालगत असलेल्या गृहसंकुलातील नागरिक, दुकानदार यांच्याही घरात, दुकानात दररोज मातीचा थर जमा होत आहे. यामुळे नागरिक मेटाकुटीला आले असून कामांची मुदत ठरवून त्या वेळेत काम पूर्ण करावे व तशी सूचना कामाच्या ठिकाणी लावावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. कामानिमित्त घराच्या बाहेर दररोज माणूस पडतो. या रस्त्यावरुन जाताना अंगावर, डोक्यात पूर्णतः मातीचा थर जमा झालेला असतो. त्यामुळे सर्दी, खोकला तसेच अंगावर खाज येणे, रॅसेस उठणे यांसारख्या समस्या आम्ही फेस करत आहोत.
गेले महिनाभर एमआयडीसीतील रस्त्यांचे काम सुरु आहेत. मात्र ती काही प्रमाणातच झाली आहेत. अद्याप खूप कामे शिल्लक आहेत. ती कधी पूर्ण होणार, हा त्रास किती महिने सहन करायचा.
- विश्वजीत पुराणिक, स्थानिक नागरिक
रस्यांची कामे ही नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी योग्य आहेत. परंतू एखाद्या रस्त्याचे काम हाती घेतल्यानंतर ते किती कालावधीत पूर्ण होईल याची माहिती त्या ठिकाणी दिली पाहीजे. म्हणजे नागरिकांना त्या कालावधीत पर्यायी रस्ता किंवा त्रास सहन करण्याची मानसिकता तयार करता येईल.
शिवाय धूळ उडणे ही समस्या आजची नाही त्यावर काहीच उपाययोजना केली जात नाही. या धुळीमुळे नागरिकांसह पक्षी, झाडांचे ही नुकसान होत आहे. त्याचा कोणी विचार करणार आहे का ?
- प्राची कुलकर्णी, स्थानिक नागरिक