दिघ्यातील साने गुरुजी उद्यानातून व्यावसायिकाला रस्ता

उद्यानातून बांधकाम व्यावसायिकाला रस्ता काढून देण्यात आला.
उद्यानातून बांधकाम व्यावसायिकाला रस्ता काढून देण्यात आला.

नवी मुंबई : दिघ्यातील साने गुरुजी बाल उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. उद्यान पाडून बांधकाम व्यावसायिकाला रस्ता काढून देण्यात येत असल्यामुळे साने गुरुजी बाल उद्यानासाठी पालिकेकडून करण्यात आलेला खर्च वाया गेला असून, त्यामुळे आता उद्यानाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवर नवी मुंबई महापालिकेने एमआयडीसी प्रशासनाची परवानगी न घेताच उद्यानांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आणत दोन कोटी ६७ लाख रुपये खर्च करून पाच वर्षांपूर्वी कायापालट केला. मात्र, एमआयडीसीच्या असणाऱ्या या जागेवर पालिकेने अतिक्रमण केल्यामुळे एमआयडीसीने एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावत नवी मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल केला होता. पालिकेवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल होणारी राज्यातील पहिलीच घटना होती. साने गुरुजी बाल उद्यानाला लागूनच एमआयडीसीच्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण करत, इमारत उभी करण्याचा प्रयत्न केला होता. 

मात्र, एमआयडीसीने या भूखंडावरील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी कंपाऊड टाकून हा भूखंड विक्रीसाठी काढला होता. मात्र, या भूखंडाला रस्ता नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने प्रत्यक्षात या कामाला सुरुवात केली नव्हती; तर एमआयडीसीकडे साने गुरुजी बाल उद्यानातून रस्ता देण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाला एमआयडीसीने रस्ता बांधण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता साने गुरुजी बाल उद्यानातून बांधकाम व्यावसायिकासाठी रस्ता बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पावसामध्ये काम सुरू करण्याची परवानगी नसतानादेखील व्यावसायिकाने बिनधास्तपणे खोदकाम करून काम सुरू केले. त्यामुळे साने गुरुजी बाल उद्यान हे नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्यानाचे अर्धवट अवस्थेत काम असतानादेखील मोठ्या थाटामाटात उद्यानाचे उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, एवढ्या मोठया प्रमाणात खर्च करून आता बांधकाम व्यावसायिकाला रस्ता काढून देण्यात आल्याने उद्यानात असणारे खेळाचे साहित्य, टॉयट्रेन, ओपन जिमचे साहित्य काढून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्यांचे प्रमाणदेखील कमी झाले असून, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

बांधकाम व्यावसायिकाला साने गुरुजी बाल उद्यानातून रस्ता काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याने उद्यानाची होणारी नुकसानभरपाई करून, उद्यान चांगल्या स्थितीत करायचे आहे.
- एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अंभियता, एमआयडीसी.

साने गुरुजी बाल उद्यानात बांधकाम व्यावसायिकाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. साने गुरुजी बाल उद्यानाच्या लगत असणाऱ्या विसर्जन घाटावरदेखील अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे व्यावसायिकावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पालिकेकडे करण्यात आली आहे.
- जगदीश गवते, दिघा प्रभाग समिती, अध्यक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com