खड्ड्यांवर यंदा "देशी उतारा'!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

विविध विदेशी प्रयोग केल्यानंतर आगामी पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका "कोल्डमिक्‍स' हे देशी तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यासाठी 1,274 टन मिश्रण तयार करून ते प्रभागांना वितरित करण्यात आले आहे. पाच वर्षांत पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी सुमारे 250 कोटींचा खर्च केला आहे.

कोल्डमिक्‍सचे 1274 टन मिश्रण तयार; पाच वर्षांत 250 कोटी खर्च
मुंबई - विविध विदेशी प्रयोग केल्यानंतर आगामी पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका "कोल्डमिक्‍स' हे देशी तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यासाठी 1,274 टन मिश्रण तयार करून ते प्रभागांना वितरित करण्यात आले आहे. पाच वर्षांत पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी सुमारे 250 कोटींचा खर्च केला आहे.

पालिका खड्डेदुरुस्तीवर सरासरी 30 ते 35 कोटी रुपये खर्च करते. खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने अनेक प्रयोग केले आहेत; मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे यंदा कोल्डमिक्‍स हे देशी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. हे डांबर-खडीचे मिश्रण पालिकेच्या वरळी येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहे. गतवर्षी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तब्बल दोन हजारांहून अधिक तक्रारी आल्या होत्या. त्या काळात अचानक डांबराच्या मिश्रणाचा तुटवडा निर्माण झाल्याने यंदा पावसाळ्यापूर्वीच मिश्रण तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार 1,435 टन मिश्रण तयार करून त्यातील 1,274 टन मिश्रण प्रभागांना वितरित करण्यात आले आहे.

आतापर्यंतचे प्रयोग...
- जेटपॅचर - हे यंत्र पालिकेने 2009 मध्ये विकत घेतले होते; पण एकदाही न वापरता देखभालीवर 68 कोटींचा खर्च.
- मिडास टच - हे ऑस्ट्रियन तंत्रज्ञान जूनमध्ये वापरले होते; प्रत्येक किलोला 130 रुपयांचा खर्च येतो.
- हॉटमिक्‍स कोल्डमिक्‍स - या देशी पद्धतीने अनेक वर्षांपासून खड्डे दुरुस्ती सुरू आहे. तसेच "मास्टिक' मिश्रणाचाही वापर केला जातो.
- शालिमार-इकोग्रीन - 2016 मध्ये काही कंपन्यांनी बनवलेले डांबर-खडीचे हे मिश्रण वापरण्यात आले होते; मात्र ते फारसे प्रभावी ठरले नाही.

Web Title: Road Hole Coldmix Municipal Expenditure