रस्त्यांवरील बर्फाचा गारवा जीवघेणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबईतील 96 टक्के नमुने दूषित

मुंबईतील 96 टक्के नमुने दूषित
मुंबई - रस्त्यांवरील उसाचा रस, फळांचा रस, लस्सी, ताक यातील बर्फाचा गारवा जीवघेणा ठरण्याचा धोका आहे. मुंबई महापालिकेने तपासलेल्या बर्फाचे तब्बल 96 टक्के नमुने दूषित आढळले आहेत. 14 प्रभागांतील 100 टक्के नमुने दूषित होते. 75 टक्के बर्फात "ई कोलाय' हा विषाणू आढळला. हे बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने अन्न व औषध प्रशासनाकडे शिफारस केली आहे.

उन्हाळा सुरू झाल्यावर मुंबईत रस्त्यावर बर्फाचे गोळे, सरबत, लस्सी व ताक विकले जाते. त्यातील बर्फ आरोग्याला घातक असतो. पालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यावरील विक्रेते वापरत असलेल्या बर्फाच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यातील 96 टक्के बर्फाचे नमुने दूषित आढळले. पालिकेच्या 24 पैकी 14 प्रभागांतील बर्फाचे 100 टक्के नमुने दूषित आढळले. 75 टक्के बर्फाच्या नमुन्यांत "ई कोलाय'सारखा विषाणू आढळला असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावरील थंड पेये पिऊ नयेत, असे आवाहन पालिकेने केले आहे. ई कोलायमुळे अतिसार, जुलाब, कावीळ, विषमज्वर यांसारखे आजार होतात.

गोवंडी, देवनारमध्ये धोका
गोवंडी, देवनार या परिसरात रस्त्यावरील थंड पेये पिणे म्हणजे कॉलरा, टायफॉईड यांसारख्या आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. या भागांतील 100 टक्के बर्फाच्या नमुन्यांत "ई कोलाय' आढळला आहे.

Web Title: road ice dangerous