नोटाबंदीच्या निर्णयावर पथनाट्यातून प्रहार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

कॉंग्रेसचा अनोखा फंडा; रिझर्व्ह बॅंकेला उद्या घेराव

कॉंग्रेसचा अनोखा फंडा; रिझर्व्ह बॅंकेला उद्या घेराव
मुंबई - शिवसेना-भाजप युतीने केलेला भ्रष्टाचार, मुंबईतील अनेक समस्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर पथनाट्यातून प्रहार करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. पालिका निवडणुकीत मुंबई कॉंग्रेसतर्फे पथनाट्याद्वारे अनोख्या पद्धतीने प्रचार व प्रसार केला जाणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया नोटाबंदीच्या विषयावर पूर्णतः अपयशी ठरली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. 18) अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण देशातील 18 कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे.

हे पथनाट्य शाहीर साबळे यांचे नातूभाऊ मंदार शिंदे यांनी तयार केले आहे. मुंबईत 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत दररोज पाच ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात येईल. या पथनाट्यात नोटाबंदी, मुंबईतील अस्वच्छता, पेंग्विन हट्ट, मुंबईतील रुग्णालयांची दुरवस्था, मुंबई महापालिकेतील लाचखोरी व गैरव्यवहार, रोगराई या विषयांवर मार्मिक भाष्य केलेले आहे, अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे; फक्त जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला काही जागा देणार आहोत. मुंबईतील सर्व नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कळवले आणि त्यांनी आम्हाला परवानगीही दिली आहे, असे निरुपम यांनी सांगितले.

Web Title: road show attack on currency ban decission