एमआयडीसीतील रस्त्याचे काम संथगतीने!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

रबाळेपासून मुकुंद कंपनी पर्यंतच्या रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून संथगतीने सुरू असल्यामुळे आता डिसेंबर अखेरचा मुहूर्त हुकणार आहे. मार्च अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत एमआयडीसीमधील महापे ते मुकुंद कंपनीपर्यंतच्या रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम करण्यात येत आहे. यात महापेपासून रबाळेपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, रबाळेपासून मुकुंद कंपनी पर्यंतच्या रस्त्यांचे काम मागील चार वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. ठेकेदाराला वाढीव मुदत देत डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पालिका प्रशासनाने दिल्या होत्या; परंतु संथगतीने काम सुरू असल्यामुळे आता डिसेंबर अखेरचा मुहूर्तदेखील हुकणार असून, मार्च अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

नवी मुंबई महापालिकेकडून एकात्मिक रस्ते प्रकल्पांतर्गत शहरात रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. एमआयडीसीमधील रस्त्यांचेदेखील सिमेंटीकरण करताना महापेपासून मुकुंद कंपनीपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. यात महापेपासून रबाळेपर्यंतच्या रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, गवते कुटुंबीयांच्या असणाऱ्या जमिनीचा २०० मीटरच्या रस्त्यातून हा रस्ता जात आहे. हा रस्ता सिमेंटीकरण करण्यासाठी गवते कुटुंबीयांनी विरोध असून त्यांनी उच्च न्यायालयातून त्याला स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे रबाळे ते मुकुंद कंपनीपर्यंतच्या रस्त्यांचे काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदाराला २०० मीटरच्या रस्त्याचे काम सोडून उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिल्या होत्या. मात्र, मागील चार वर्षांपासून ठेकेदारांकडून संथगतीने काम सुरू असल्यामुळे रखडलेल्या म रस्त्याच्या ठिकाणासह काम सुरू असणाऱ्या ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. 

रबाळेपासून ते मुकुंद कंपनीपर्यंतचे काम हे सुरू असून, डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने काम करण्यात अडचणी येत आहे. तरी मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण होईल.
- संजय देसाई, कार्यकारी अंभियता, नवी मुंबई महापालिका.

एमआयडीसीमध्ये असणाऱ्या या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर परिवहनच्या बस या मार्गाने बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एमआयडीसीमध्ये कामाला जाणे सोयीस्कर होणार आहे.
- सागर कांबळे, कामगार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road work in MIDC is slow!