
Mumbai News : रिसायकल तंत्रज्ञान वापरुन रस्त्यांची कामे करावी...
डोंबिवली - पाणी हा रस्त्यांंचा एक नंबरचा शत्रू आहे, त्याला जितके लांब ठेवाल तितका रस्ता जास्त काळ सुस्थितीत राहील. त्यासाठी रस्ता तयार करताना त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे अथवा अन्य पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था ही केली गेली पाहीजे.
रस्ता तयार करण्याआधीच भूमिगत पाईपलाईनचे काम होणे आवश्यक आहे. एकदा रस्ता खोदला की त्याची वाट ही लागतेच. सीडनी येेथे स्टील उत्पादनातील मळी वापरुन रस्ते तयार करण्यात आले आहेत.
राज्यात हा प्रयोग सगळीकडेच यशस्वी होईल असे नाही, परंतू त्या त्या ठिकाणी वेस्टेज जे उत्पादन आहे त्यावर प्रयोग करुन असे रस्ते तयार करता येतील. सर्वच ठिकाणी वेस्टेज उत्पादनापासून तयार केलेले रस्ते उपयोगी होणार नाहीत परंतू ज्या 100 किमी च्या परिसरात हा प्रयोग राबविता येत असल्यास शासनाने असा जीआर काढण्यास हरकत नाही असे मत महामार्ग निर्मिती तज्ञ डॉ. विजय जोशी यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
ब्राह्मण सभा डोंबिवली यांच्यावतीने रविवारी डोंबिवलीत विजयपथ एक संवाद रस्त्यांविषयी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात महामार्ग निर्मिती तज्ञ डॉ. विजय जोशी, सार्वजनिक बांधकाम आणि अन्न नागरी पुरवठा महाराष्ट्र राज्य मंत्री रविंद्र चव्हाण सहभागी झाले होते.
संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. विनय भोळे, सुचेता पिंगळे, श्रीकांत कानडे हे व्यासपिठावर उपस्थित होते. तसेच या परिसंवादास पीडब्ल्युडी विभागाचे अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील रस्त्यांची दुरावस्था आहेच शिवाय कल्याण डोंबिवली शहर ही रस्त्यांवरील खड्ड्यांनी चांगलेच गाजले आहे. रस्त्यांचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम सुरु असले तरी रस्त्यांचा दर्जा पहाता ते कितपत टिकतील. सीडनी येथे जोशी यांनी राबविलेला प्रयोग राज्यात अथवा कल्याण डोंबिवलीत राबविणे शक्य आहे का ?
आदि विषयांवर यावेळी संवाद साधण्यात आला. डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे स्टील उप्तादनात तयार होणाऱ्या मळीचा वापर करुन ्अनेक रस्ते बांधले गेले आहेत. या रस्त्यांमध्ये सिडनी विमानतळाची धावपट्टी पासून ते देशातील वेगवेगळ्या भागांमधून जाणारे शेकडो किमी लांबीचे महामार्ग यांचाही समावेश आहे.
आपल्या कामाविषयी डॉ. जोशी यांनी यावेळी माहिती दिली. रस्ते खराब का होतात याविषयी माहिती देतना ते म्हणाले, रस्ता दिर्घ काळ चांगला रहावा यासाठी त्यावर पाणी साचू न देणे हे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था असावी. आपल्याकडे रस्ता तयार झाला नाही की, पाईपलाईनचे काम किंवा इतर कामासाठी तो खणला जातो.
कोणताही रस्ता तयार करत असताना 100 किंवा 200 मीटरला क्रॉस कनेक्शन टाकत पीव्हीसीचे पाईप घालून ठेवलेले असतात. एका सोसायटीच्या लाईनमधून दुसऱ्या सोसायटीला पाईपलाईन जर फिरवायची असेल तर रस्ता कशाला खोदता, पीव्हीसीचे जे पाईप आहेत त्या खालून टाकता येतात. चार इंचाची पाईपलाईन टाकायला 6 इंचाचे खोदकाम केले जाते. त्यानंतर परत तो खड्डा व्यवस्थित बुजविला जात नाही. महोत्सवाचे मंडप टाकण्यासाठी खड्डे खणतात. खड्डा खणला की रस्ता खराब झालाच समजा असे ते म्हणाले.
भारत सरकारला स्टीलपासून निर्माण होणाऱ्या मळी पासून रस्ते तयार करण्याचा सल्ला जोशी यांनी दिला असून त्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शक्य त्या ठिकाणी रिसायकल मटेरीअल वापरुन रस्ते तयार होत असल्यास शासनाने तसा जीआर काढावा. असे रस्ते तयार करताना शासनाच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून काम करावे असा सल्ला त्यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण रस्त्यांच्या कामाविषयी म्हणाले, रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडे पुरेसा निधी नाही परंतू या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले गेले आहे. या कामातील स्पीडवर्क पहाता वेगळ्या पद्धतीने काम होणे गरजेचे आहे. मात्र वेगवेगळी खाती आणि राजकारणही त्यात तेवढेच आहे असे त्यांनी सांगितले.
एखादा रस्त्याविषयी रिसायकल मटेरिअलचा वापर होऊ शकतो, तसे प्रयोग करण्यास हरकत नाही. परंतू तसे करण्याचे कोणी धाडस करत नाही. हे प्रयोग फेल गेले तर अंगावर येईल म्हणून अधिकारीही त्याला पाठबळ देत नाही. राजकीय पाठबळ अधिकाऱ्यांना मिळाले तर हे होऊ शकते. कल्याण शीळ रोडचे सीमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
पण ते योग्य पद्धतीने नाही असे ते म्हणाले. एखाद्या रस्त्याचे काम होत असताना तेथे कंत्राटदार, जेई हे उपस्थित आहेत की नाही हे नागरिकांनी पहाणे आवश्यक आहे. पण त्यांच्यात त्याविषयी सजगता नाही असे चव्हाण म्हणाले. जेई ने कामाचे योग्य ऑडीट व अधिकाऱ्यांचे त्यावर लक्ष असले पाहीजे. आपल्याकडे अधिकारी बिलींगवर अधिक जोर देतात असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.