ठाण्यात रस्ते चकाचक अन्‌ पदपथ बकाल 

रस्त्यावर असलेली भंगार वाहने
रस्त्यावर असलेली भंगार वाहने

ठाणे : अतिक्रमणमुक्त पदपथ आणि पोस्टर्समुक्त ठाणे शहरासाठी तीन दिवस विशेष मोहीम महापालिका आयुक्तांच्या आदेशाने नुकतीच राबवण्यात आली. तरीही शहरातील अनेक पदपथांवर भंगार सामान आणि बिघाड झालेल्या वाहनांचा खच पडला असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा अशा पदपथावरून चालायचे तरी कसे? असा सवाल पादचारी करीत आहेत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथच मोकळे नसतील, तर रस्त्यावर वाहनांमधून वाट काढताना एखाद्याला दुखापत होण्याची शक्‍यतादेखील वर्तवली जात आहे. 

तलावांचे शहर अशी बिरुदावली मिरवणारे ठाणे गेल्या काही वर्षांत हळूहळू कात टाकत आहे. ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा ध्यास महापालिकेला लागला असून शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रभाग समितीनिहाय "मॉडेल' रस्ते बनवण्यासाठी पदपथांची रंगरंगोटी करून रस्त्याकडेला वृक्ष लागवड केली.

त्याचबरोबर पदपथावर बसण्यासाठी अलिशान आसने बसवून शहराचा चेहरामोहरा बदलला. मात्र, मोकळ्या झालेल्या या पदपथांवर सध्या गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे वास्तव्य वाढले असून काही ठिकाणी तर पदपथावर भंगार सामान आणि वाहनांचा खच पडलेला दिसून येत आहे. 

ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील रोड क्र. 22, अंबिकानगर, साठेनगर, किसननगर आदी परिसरातील पदपथावर पार्किंग केलेल्या जुनाट गाड्या, भंगार सामान, कचरा आणि डेब्रिज पडलेले असल्याने पदपथ नक्की कोणासाठी आहे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेषतः कोपरी स्टेशन परिसर, नौपाडा, तीन हात नाका, गावंड पथ, पोखरण रोड, गावदेवी परिसरातील पदपथ केवळ नावापुरते उरल्याचे दिसून येत आहे.

पदपथ मोकळे नसल्याने पादचाऱ्यांना आणि सकाळ-सायंकाळ फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना येथून मार्गक्रमण करणे कठीण होऊन बसले असल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले आहेत. तेव्हा, दररोज शहर विकासाच्या नवनव्या संकल्पना राबवणाऱ्या पालिका आयुक्तांनी या पदपथांना पडलेला विळखा सोडवण्याची मागणी ठाणेकर नागरिक करीत आहेत. 

आयुक्तांचे आदेश केवळ वल्गनाच! 
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 4 नोव्हेंबरला सर्व विभागप्रमुखांची विशेष बैठक बोलावून पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम राबवली. सदर कारवाईनंतर सर्व सहाय्यक आयुक्तांनी पदपथावरील किती पक्की बांधकामे आणि किती तात्पुरती बांधकामे हटवली याचा अहवालदेखील महापालिका आयुक्तांनी मागवला. मात्र, शहरातील अनेक ठिकाणी आजही पदपथावर भंगार आणि वाहनांचे साम्राज्य दिसून येत असल्याने आयुक्तांचे आदेश केवळ वल्गना ठरल्याचे बोलले जात आहे. 

पदपथावरील अतिक्रमणांवर ठाणे महापालिकेकडून नियमित कारवाई केली जाते. तरीही शहरात एखाद्या रस्त्याच्या पदपथावर अशा काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केली जाईल. 
- अशोक बुरुपुल्ले 
उपायुक्त, ठाणे पालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com