रायगडमध्ये धुमाकूळ घालणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

घरफोडी करण्यासाठी आरोपी इंदूर येथून बसने धुळेमार्गे अहमदनगर, पुणे आणि घाट पार करून कोकणामध्ये येत होते. दिवसा नदी किनाऱ्याजवळ ते वास्तव्य करत होते. कुऱ्हाड, दगडसारखे हत्यारे सोबत घेऊन रात्री टोळीने घरफोड्या करीत असत. 

मुंबई : रोहा, माणगाव, महाड, मुरूड आदी दक्षिण भागातील तालुक्‍यात घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ते मध्यप्रदेशातील आहेत. त्यांच्याकडून 31 तोळे सोने, 300 ग्रॅम चांदीचे दागिने, चार मोटरसायकल असा 11 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी, चोरीच्या घटनांमुळे माणगाव, रोहा, महाड, पाली, मुरूडमध्ये घबराट होती. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांनाही अपयश आल्याने त्यांच्यावर टीका होत होती. अखेर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला. सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या अधारे त्यांनी माहिती घेतल्यानंतर मध्यप्रदेशातील एका संघटित टोळीचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. 

आरोपी धार, इंदोर, अलीराजपूर जिल्ह्यातील असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल वळसंग, हवालदार हनुमान सूर्यवंशी, मोहन मोरे, प्रतिक सावंत, सचिन शेलार, सुशील खराडे यांचे एक पथक मध्यप्रदेशमध्ये पाठविण्यात आले.

 खबऱ्यांकडून माहिती घेऊन घरफोडी, चोरी करणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. सुनील लालसिंग मुझालदा (वय 23), रवी ऊर्फ छोटू मोहन डावर (18), कपिल गजेंद्र पांचोली ऊर्फ जैन (18) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पेण, माणगाव, पाली, गोरेगाव, मुरूड, रोहा, महाड शहरामधील 12, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूणमध्ये 6, पुण्यातील भोरमधील एक, अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमधील दोन अशा 21 ठिकाणी चोरी, घरफोडी केल्याचे त्यांनी कबूल केले. 

अशी करीत होते घरफोडी 
घरफोडी करण्यासाठी आरोपी इंदूर येथून बसने धुळेमार्गे अहमदनगर, पुणे आणि घाट पार करून कोकणामध्ये येत होते. दिवसा नदी किनाऱ्याजवळ ते वास्तव्य करत होते. कुऱ्हाड, दगडसारखे हत्यारे सोबत घेऊन रात्री टोळीने घरफोड्या करीत असत. त्यानंतर परिसरातील मोटरसायकल चोरी करून त्या मोटरसायकलच्या अधारे मध्यप्रदेशात जात होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery gang arrested