नेरुळमधील रॉक गार्डनची ‘माती’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथे बांधलेल्या रॉक गार्डन या निसर्गरम्य उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. पैसे घेऊनही या ठिकाणी अनेक साहित्य नादुरुस्त असल्याने बच्चे कंपनीसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथे बांधलेल्या रॉक गार्डन या निसर्गरम्य उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. पैसे घेऊनही या ठिकाणी अनेक साहित्य नादुरुस्त असल्याने बच्चे कंपनीसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

नेरूळ येथे विस्तीर्ण अशा जागेत पालिकेने रॉक गार्डन उभारले आहे. या रॉक गार्डनमध्ये पाच वर्षांपुढील मुलांसाठी तीन रुपये; तर प्रौढांसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाते. हिरवाईने नटलेल्या या गार्डनमध्ये प्राण्यांचे चित्रशिल्प, लहान मुलांसाठी प्ले-गाऊंड, प्रेक्षणीय स्थळे, ॲम्पी थिएटर उभारण्यात आलेले आहे. प्रेक्षणीय स्थळांमधील मंकी पॉईट व धबधबा असणाऱ्या शिल्पाचा रंग उडालेला असून, धबधब्यामध्ये पावसाळा असूनही पाणी नाही. त्यामुळे हा धबधबा कोरडा पडला आहे. तर दुसरीकडे कमळ तलाव असून, या तलावात पाण्याअभावी शेवाळ वाढल्याने दुर्गंधी पसरली आहे. कमळ तलावात एकही कमळ नसल्याने मुलांना त्याचा आनंद घेता येत नाही. राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर रॉक गार्डनमध्ये असलेल्या हरिण व काळविटांच्या शिल्पाची शिंगे तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी असणाऱ्या दीपस्तंभातील छतातून पाणी गळत असल्याने त्यावर प्लास्टिक टाकण्यात आले आहे. याशिवाय लहान मुलांसाठी असलेला झोपळा, घसरगुंडी हे साहित्य अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे.

या गार्डनमध्ये खेळांच्या साहित्याबरोबरच राशीचे माहिती देणारे राशीचक्र स्थळ उभारण्यात आलेले आहे. मात्र, राशीच्या माहिती देणाऱ्या पाट्या रंग उडाल्याने पांढऱ्या पडल्या आहेत. या ठिकाणी संत गाडगेबांबाचे तैलचित्र व संदेश देणारे फलक उभारण्यात आलेले आहेत; मात्र रात्रीच्या वेळेला विद्युत रोषणाई बंद असल्याने नागरिकांना सूर्य मावळण्याच्यापूर्वीच या उद्यानातून काढता पाय घ्यावा लागतो. पैसे घेऊनही या ठिकाणी योग्य प्रकारे सुविधा मिळत नसल्याने पालकवर्गाने आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानासाठी महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करते; मात्र अशा माहितीपर उपक्रमांची झालेली दुरवस्था पालिकेला कशी दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

ठाण्यावरून नेरूळ रॉक गार्डनमध्ये आम्ही दर दोन महिन्यांनी येतो. मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी खेळाचे साहित्य व विद्युतरोषणाई अशा विविध समस्या दिसून येत आहेत. या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना साहित्यांच्या नासधुशीबाबत विचारले असता त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तर दिली जातात.
- पूजा जाधव, महिला.

रॉक गार्डनमध्ये काही नासधुस झालेली असल्यास इलेक्‍ट्रिक तसेच बांधकाम विभागाला याची माहिती देऊन दुरुस्ती करण्यात येईल.
- नितीन काळे, उपायुक्त उद्यान विभाग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rock Garden parts damages in Nerul