शरद पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर नातवानं दिलं फडणवीसांना प्रत्युत्तर..लगावला  सणसणीत टोला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांचा नातू आणि आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांचा नातू आणि आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे सांगत मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला घेऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवारांवर टीका केली. 

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विविध मागणी करत आहे. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता. त्यावर रोहित पवारांनी ट्विट करत फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

फडणवीसजी, पवार साहेबांच्या पत्राची चिंता करण्याऐवजी राज्यासाठी आपण काय करतो यावर आत्मपरीक्षण करा, असा टोला रोहित पवार यांनी हाणला आहे. पवार साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळं साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा. ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल, असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

मोठी घोषणा: १ जूनपासून धावणार non AC ट्रेन्स; जाणून घ्या बुकिंगची प्रक्रिया..

फडणवीसांनी राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा, असा टोलाही रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे. 

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारची तक्रार केली होती. या भेटीवरुनही रोहित पवार यांनी फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत. आणखी एक ट्विट करुन त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, फडणवीसजी आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल.

हेही वाचा: ..अन मुलुंडचे वृद्धाश्रम हादरले! २१ जणांना कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीनंतर काय म्हणाले:

 केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं असंही ते म्हणालेत. केंद्राने 85 टक्के तिकिटाचे पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेच्या खर्च किती येतो हेच माहित नाही, त्यामुळे महाराष्ट्र बचाव ही भाजपनं भूमिका घेतली असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. 

आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे, आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्यात. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको.

सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत. केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही, रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही आहे. 

रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होताना दिसत आहेत. एक डॅशबोर्ड बनवून, रुग्णालयातील जागा सांगू शकतो, त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल, आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही. 

पायी जाणाऱ्या मजुरांना थांबवा या सूचना केल्या होत्या, मात्र जातात तर जाऊ द्या. आपलं संकट टळतंय अशी धारणा होती, मात्र या मजुरांना ट्रेन किंवा बसने पाठवलं जाऊ शकलं असतं. 

सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे, बारा बलुतेदारांचा विचार सरकारने करायलाच हवा, अन्य राज्याने केला मग आमचं सरकार कधी करणार असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला.

rohit pawar gives reply to devendra  fadanvis for criticizing sharad pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit pawar gives reply to devendra fadanvis for criticizing sharad pawar