वाशीत घराचे छत कोसळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

तीन दिवसांपूर्वी सीवूड्‌समधील शिवदर्शन सोसायटीमध्ये घराच्या छताचा भाग अंगावर पडून नीलेश सुर्वे या व्यक्तीचा पाय मोडल्याची घटना ताजी असतानाच वाशीतील सेक्‍टर २६ मधील शिवनेरी नगरमधील चिंतामणी सोसायटीत राहत्या घरात छताचे प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे.

मुंबई : नवी मुंबईत सिडकोनिर्मित घरांच्या छताचा भाग कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी सीवूड्‌समधील शिवदर्शन सोसायटीमध्ये घराच्या छताचा भाग अंगावर पडून नीलेश सुर्वे या व्यक्तीचा पाय मोडल्याची घटना ताजी असताना सेक्‍टर २६ मधील शिवनेरी नगरमधील चिंतामणी सोसायटीत राहत्या घरात छताचे प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे; मात्र या घरात राहणाऱ्या व्यक्तीने वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्याचे आणि त्याच्या पत्नीचा जीव थोडक्‍यात बचावला.

वाशी, सेक्‍टर २६, चिंतामणी सोसायटीत बी ३६ या भगवान दिलपाक यांच्या मालकीच्या घरात बुधवारी (ता.३१) पहाटे ६ वाजता छताचा भाग पडला. मात्र या घरात राहत असलेले भाडेकरू सोमनाथ ढाकणे हे आपल्या पत्नीसह गाढ झोपेत असताना सकाळी सहा वाजता घरात छताच्या प्लास्टरचा काही भाग पडला. या आवाजाने  दाम्पत्य घराबाहेर पडले. मात्र घराबाहेर पडताच छताचे प्लास्टर संपूर्ण खाली पडले. ढाकणे यांनी प्रसंगाधान दाखवल्याने त्यांचे व त्यांच्या पत्नीचे प्राण बचावले.

सिडकोच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह
सेक्‍टर २६, शिवनेरी नगरमधील सर्वच्या सर्व इमारती महापालिकेने अती धोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारती राहण्यास योग्य नसल्याबाबत सर्व सोसायटी प्रवेशद्वारांवर तसे फलकही लावले होते; मात्र या इमाररती बांधून अवघी २५ ते २६ वर्षे झाली असून एवढ्या लवकर या इमारती अतिधोकदायक झाल्याने सिडकोच्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The roof of the house collapsed