मुंबई, ठाण्यात "रिपब्लिकन' शून्य

- विष्णू सोनवणे
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पाडापाडीच्या राजकारणामुळे गटांचे अस्तित्व धोक्‍यात
मुंबई - रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांच्या उमेदवारांमध्ये एकमेकांना पाडण्याची स्पर्धा लागल्याने त्यांचा मुंबई आणि ठाण्यात दारुण पराभव झाला. या पराभवामुळे रिपब्लिकन गटांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

पाडापाडीच्या राजकारणामुळे गटांचे अस्तित्व धोक्‍यात
मुंबई - रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांच्या उमेदवारांमध्ये एकमेकांना पाडण्याची स्पर्धा लागल्याने त्यांचा मुंबई आणि ठाण्यात दारुण पराभव झाला. या पराभवामुळे रिपब्लिकन गटांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत मोठी ताकद आहे. 2012च्या निवडणुकीत वरील दोन्ही गटांचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता. रिपब्लिकनच्या सर्व गटांचे 1992 मध्ये ऐक्‍य झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते.

या वेळी प्रत्येक गट स्वतंत्र लढल्यामुळे सर्वांच्या पदरी अपयश पडले. आठवले गटाने मुंबईत 18 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी सहा जागांवर भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते, तर 11 जण कमळ चिन्हावर लढत होते. त्यांच्या प्रचाराला भाजपचा एकही नेता फिरकला नाही. या वेळी आठवले यांना एकही जागा जिंकता आली नाही. भारिपने मुंबईत 49 जागा लढवल्या होत्या. आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला होता. मात्र, हा प्रयोग अपयशी ठरला. चेंबूरची जागाही भारिपला राखता आली नाही. आंबेडकर आणि आठवले यांना मानणारा मुंबईत मोठा वर्ग आहे. मुंबईतील 20 प्रभागांमध्ये दलितांचे प्राबल्य आहे; परंतु कोणत्याच रिपब्लिकन गटाला एकही जागा जिंकता आली नाही.

डॉ. सुरेश माने यांच्या रिपब्लिकन बहुजन सोशालिस्ट पक्ष, जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष, डॉ. राजेंद्र गवई यांचा गट आणि बसपला एकही जागा मिळू शकली नाही.

तुटपुंजे यश
आठवले गटाचे उल्हासनगरमध्ये भगवान भालेराव, त्यांच्या पत्नी अपेक्षा भालेराव, अमरावतीमध्ये प्रकाश बनसोडे, वर्ध्यामध्ये विजयभाऊ आगलावे, पुण्यात सिद्धार्थ धेंडे, नवनाथ कांबळे आणि सुनीता वाडेकर जिंकले. उल्हासनगरमध्ये भारिपच्या कविता बागूल निवडून आल्या.

जोपर्यंत राजकीयदृष्ट्या दलित कार्यकर्ते जागृत होत नाहीत तोपर्यंत दलित मतांचे विभाजन होईल. आम्हाला दिलेल्या सहा ते आठ ठिकाणी भाजपने उमेदवार उभे केले. आमची मते भाजपला मिळाली. मात्र, त्यांची मते आमच्या उमेदवारांना मिळाली नाहीत.
- अविनाश महातेकर, नेते, रिपब्लिकन पक्ष

Web Title: rpi party zero in mumbai thane