एप्रिलमध्ये 30 कोटी रुपये वसुलीचा आयुक्तांचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

ठाणे - नियमित वसुलीसह एप्रिल महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत 20 कोटी मालमत्ता कर व 10 कोटी पाणी कर वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. याबाबत कुठलेही कारण ऐकून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. ही वसुली करण्यात अपयशी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

महापालिकेच्या वसुलीबाबत महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या वसुलीबाबत असमाधान व्यक्त करून जयस्वाल यांनी एप्रिलपासून नियमित वसुली करण्यात यावी, असे आदेश देतानाच या महिन्यामध्ये 10 कोटी रुपये पाणी कर आणि 20 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर या वर्षी पाणीपुरवठा विभागाने वर्षभरामध्ये एक बिल न देता वर्षभरामध्ये दोन बिले देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

महापालिकेच्या जकातबंदीनंतर एलबीटीवरही बंदी आली आहे. त्यामुळे महापालिकेला दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मालमत्ता करावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रशासनाच्या वतीने सुमारे 10 टक्के करवाढ सुचविण्यात आली आहे. या दरवाढीला सत्ताधारी आणि विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होणार आहे. मुळात सत्ताधारी शिवसेनेने तर त्यांच्या वचननाम्यात 500 फुटांपर्यंतच्या घरांची मालमत्ता करातून सुटका करण्याचे वचन दिले आहे. अशा वेळी प्रशासनाची दरवाढ सत्ताधाऱ्यांकडून मान्य केली जाणार नसल्याची चर्चा आहे. 

त्याच वेळी महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणात विकासकामे असल्याने आयुक्तांनी महसूल वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातही मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवसुलीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

Web Title: Rs 30 crore in April-booking orders Commissioner