ठाण्यात 700 कोटींचे प्रस्ताव 10 मिनिटांत मंजूर 

ठाण्यात 700 कोटींचे प्रस्ताव 10 मिनिटांत मंजूर 

ठाणे : पंचवीस वर्षे ठाणेकरांनी आम्हाला सत्ता दिलेली आहे. बहुमताच्या जोरावर आम्ही आमची कामे रेटणारच, असा सज्जड दम शिवसेनेचे सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी शनिवारी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांना दिला. एवढेच नव्हे, तर 10 मिनिटांत सुमारे सातशे कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्याची करामतही केली. सत्ताधारी शिवसेनेची ही एकाधिकारशाही विरोधकांबरोबरच ठाण्यातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. 

ठाणे नगरपालिका परिवहनमधील एका वादग्रस्त विषयावरून राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी प्रशासनासह सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडले होते. शिवसेनेवर त्यांनी सातत्याने टीकेचे बाण सोडल्यानंतर मुल्ला यांना पुढे बोलू न देता बहुमताच्या जोरावर कोट्यवधींचे विषय मंजूर करण्याची परंपरा शिवसेनेने कायम राखली. स्थानिक स्वराज्य संस्थेत महापालिकेचे सभागृह हे लोकशाहीचा पाया मानले जाते, पण याच सभागृहात विरोधकांना प्रस्तावावर साधे बोलूही न देता शिवसेनेने अनेक वादगस्त प्रस्ताव मंजूर करून घेतले.

शनिवारच्या सभेत रस्ते, गटार, पायवाटा, मलनि:सारण, आरोग्य, हिरानंदानी येथील वादग्रस्त भिंत, नवे थीम पार्क असे अनेक विषय मंजुरीसाठी सादर झाले होते. त्यात काही किचकट प्रस्तावसुद्धा होते. या विषयांवरून विरोधक कोंडीत पकडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सभा गुंडाळण्यास प्राधान्य दिले. 

विरोधक आक्रमक 

"सोनेरी ठेकेदार कोण कोण... सत्ताधारी हाय हाय' अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी शनिवारी महापालिकेचे सभागृह दणाणून सोडले. 150 बसेसची दुरुस्ती करून त्या खासगी ठेकेदाराला देण्याच्या ठरावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला, पण बहुमताच्या जोरावर शिवसेनेने हा ठराव मंजूर करून घेतला.

त्यावर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, सुहास देसाई, भाजपचे गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील महिला नगरसेवकांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांना घेराव घातला. विरोधकांच्या आक्रमकतेला सामोरे जाण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेला राष्ट्रगीताचा आधार घ्यावा लागला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com