राजगुरू होते संघाचे स्वयंसेवक: प्रचारकांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नागपूरमध्ये मार्चमध्ये झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत या पुस्तकाच्या काही प्रतींचे वाटपही झाले. या पुस्तकातील "स्वयंसेवक स्वतंत्रता सेनानी' या प्रकरणात त्यांनी हा दावा केला आहे.

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक राजगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहिते वाड्याचे स्वयंसेवक होते, असा दावा संघाचे माजी प्रचारक, पत्रकार नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या "भारत वर्ष की सर्वांग स्वतंत्रता' या पुस्तकात केला आहे. हा दावा करत त्यांनी संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता, हे सांगण्याचाही प्रयत्न केला आहे.

नागपूरमध्ये मार्चमध्ये झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत या पुस्तकाच्या काही प्रतींचे वाटपही झाले. या पुस्तकातील "स्वयंसेवक स्वतंत्रता सेनानी' या प्रकरणात त्यांनी हा दावा केला आहे.

लाला लजपत राय यांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी इंग्रज अधिकारी सॅंडर्सवर लाहोरमध्ये गोळ्या झाडल्यानंतर राजगुरू यांनी नागपूरमधील संघ मुख्यालयात संघाचे संस्थापक हेडगेवार यांची भेट घेतली. हेडगेवार यांनी राजगुरू यांच्या राहण्याची सोय केली. तसेच पोलिस शोध घेत असल्याने राजगुरू यांनी त्यांच्या पुण्यातील घरी जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला होता, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. 

Web Title: RSS claims freedom fighter Rajguru was a swayamsevak