राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व समाजाचा : भागवत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

संघ हा सर्व समाजाचा आहे. संघाचे स्वयंसेवक समर्पण वृत्तीने काम करतात. ते सामान्य कुटुंबांतील आहेत; तसेच मोठी कीर्ती मिळालेल्या व्यक्तीही आहेत.

मुंबई : भारतीयत्व कायम राहिले तरच देश म्हणून भारत मोठा होईल, असे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व समाजाचा आहे, असे उद्‌गारही त्यांनी काढले. 

विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते कामत यांचा सत्कार करण्यात आला. प्रबोधनकार ठाकरे कलादालनातील कामत यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटनही भागवत यांनी केले. 

संघ हा सर्व समाजाचा आहे. संघाचे स्वयंसेवक समर्पण वृत्तीने काम करतात. ते सामान्य कुटुंबांतील आहेत; तसेच मोठी कीर्ती मिळालेल्या व्यक्तीही आहेत. कामत हे त्यापैकीच आहेत, असे ते म्हणाले. 

समाजाला प्रदूषित करण्यापेक्षा प्रफुल्लित करण्याचे काम कलासाधकाने केले पाहिजे. संघाकडून मिळालेला हे संस्कार मला आयुष्यभर पुरेल, असे कामत सत्काराला उत्तर देताना म्हणाले. आयुष्य आणि रेषेला उत्तम संस्कारांचे वळण मिळणे आवश्‍यक असते. मला असे वळण घरासोबत संघाकडूनही मिळाले. सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार होणे हा आयुष्यातील परमोच्च क्षण आहे, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: RSS is for whole society, says Mohan Bhagwat