ठाण्यातील पूरग्रस्तांच्या मदतीत नियमाचा अडथळा!

राजेश मोरे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

घराभोवती अथवा घरात किमान ४८ तास पाणी साचले असेल, तरच मदत देण्याचा सरकारी निर्णय असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सरसकट भरपाई मिळणे कठीण मानले जात आहे.

ठाणे : मुसळधार पावसाने सलग तीन दिवस ठाणे शहर आणि जिल्ह्याला झोडपून काढले होते. खडवलीनजीक जू गावातील पूरग्रस्तांना तर हेलिकॉप्टरमधून ठाण्यात आणावे लागले होते. शहरी आणि ग्रामीण भागांत पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला होता; मात्र बाधितांना मदत मिळण्यात सरकारी नियमाचा अडथळा येण्याची शक्‍यता आहे. घराभोवती अथवा घरात किमान ४८ तास पाणी साचले असेल, तरच मदत देण्याचा सरकारी निर्णय असल्यामुळे पूरग्रस्तांना सरसकट भरपाई मिळणे कठीण मानले जात आहे.

शनिवारी आणि रविवारी (ता. ३ व ४) झालेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या घरांत पाणी शिरले होते. कळवा येथील खारेगाव भागातील १५० ते २०० घरांत, तर दिवा साबे गावातील ३०० ते ४०० घरांत पाणी शिरले होते. खारीगाव, दिवा, अल्मेडा रोड आदी परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. 

दरड दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबीयांना मदत 
मागील आठवड्यात, २९ जुलैला झालेल्या मुसळधार पावसात कळवा परिसरातील आतकोनेश्‍वर नगर येथील डोंगरावरून चाळीवर दरड कोसळली होती. त्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बिरेंद्र गौतम जसवार (४०) व सनी जसवार (१०) यांच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत देण्यात आली आहे. 

नैसर्गिक आपत्तीत दर वेळी निकषांची फूटपट्टी लावून भरपाई देणे शक्‍य नसते. त्यामुळे परिस्थितीनुसार मदतीचा निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री

सरकारी नियमानुसार ४८ तास पाणी साचलेल्या ठिकाणीच नुकसानभरपाई देता येते.
- अशोक पाटील, 
तहसीलदार, ठाणे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rule barrier in Thane flood victims!