आरोग्यसेवेबाबत सत्ताधाऱ्यांचे दुटप्पी धोरण

आरोग्यसेवेबाबत सत्ताधाऱ्यांचे दुटप्पी धोरण
आरोग्यसेवेबाबत सत्ताधाऱ्यांचे दुटप्पी धोरण

नवी मुंबई : पालिकेच्या आरोग्य विभागातील कोलमडलेल्या व्यवस्थेला एकीकडे जबाबदार धरून दुसरीकडे आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या डॉक्‍टरांची भरती रोखण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत डॉक्‍टर आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांच्या १६९ जागांवरील भरती प्रक्रियेच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील भरती पुन्हा एकदा लांबणीवर गेली. 

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची आणि वैद्यकीय तज्ज्ञांची वानवा आहे. डॉक्‍टर, परिचारिका, मदतनीस आदी प्रकारातील कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे उभारण्यात आलेल्या रुग्णालयांच्या आलिशान इमारती फक्त शोभेच्या ठरल्या आहेत. रुग्णांना योग्य डॉक्‍टरांकडून वेळेत उपचार मिळत नसल्याची ओरड महापालिका रुग्णालयांतून येत आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे नुकताच वैद्यकीय तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. एकूण २८ संवर्गातील १६९ पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. २८ संवर्गापैकी पहिल्या टप्प्यात १६ संवर्गातील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करण्यात आली. कागदपत्र पडताळणी केल्यानंतर त्यांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येणार आहेत. यात अनुक्रमे एक हृदयरोग तज्ज्ञ, न्यूरो सर्जन, प्लास्टिक सर्जन, वैस्क्‍युलर सर्जन, आँकोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट, दोन न्याय वैद्यकशास्त्र तज्ज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, १६ वैद्यकशास्त्र, १४ शल्यचिकीत्सक, २३ स्त्री-रोगतज्ज्ञ, १३ बालरोगतज्ज्ञ, १२ क्ष-किरणतज्ज्ञ, ४ इंटेन्सिव्हिस्ट, ९ बधिकरणतज्ज्ञ आणि २४ कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी असे एकूण १२५ जणांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे; मात्र या प्रकारातील सर्व डॉक्‍टरांच्या भरतीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत स्थगिती देण्यात आली. प्रशासनाने आयत्या वेळेला हा प्रस्ताव पटलावर सादर केल्यामुळे सदस्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याचे कारण पुढे करून, प्रस्तावाला एक आठवड्यांची स्थगिती देण्यात आली; मात्र आता या स्थगितीमुळे भरती प्रक्रीया रखडण्याची शक्‍यता आहे. 

हे कुठले धोरण?
बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेतर्फे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आरोग्य व्यवस्थेवर लक्षवेधी मांडून पालिकेच्या आरोग्य विभागाला धारेवर धरले. चौगुले यांच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने डझनभर नगरसेवकांनी आपल्या परिसरातील नागरी आरोग्य केंद्र व रुग्णालयांमधील दुरवस्थेचा पाढाच मांडला. या सर्वांची दखल घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले; परंतु एकीकडे कान टोचल्यानंतर दुसरीकडे प्रशासन भरती प्रक्रियेला स्थगिती आणायची. हे कुठले धोरण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्या पालिकेच्या आरोग्य विभागात काही महत्त्वाच्या जागांवर ठोक मानधन पद्धतीवर डॉक्‍टर काम करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून हे डॉक्‍टर महापालिकेच्या रुग्णांना सेवा देत असल्यामुळे त्यांच्यावर या भरती प्रक्रियेमुळे कुठे अन्याय तर होणार नाही ना, हे तपासण्यासाठी डॉक्‍टरांच्या भरती प्रक्रियेच्या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. 
- जयवंत सुतार, महापौर, महापालिका 

महापालिकेची आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करण्याकरिता प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. यंत्रांसह डॉक्‍टरांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन रुग्णालयातील डॉक्‍टरांची वानवा दूर होईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com