समाजमाध्यमांवर अफवांचा पूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसाने काही दिवसांपासून जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. शहरे आणि गावांत पाणी तुंबले आहे. त्यामुळे सर्व जलमय झाल्यासारखे दिसत आहे. काही समाजकंटक या संकटाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकून अफवा पसरवत आहेत. 

महाड (बातमीदार) : आंबेत पूल कोसळला... धरणाचे पाणी सोडले... रस्त्यावर मगरी आल्या .... अशा एक ना अनेक अफवांचा महापूर रायगड जिल्ह्यात समाजमाध्यमांद्वारे आला आहे. त्याची दखल अखेर जिल्हा प्रशासनानेही घेतली असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. 

मुसळधार पावसाने काही दिवसांपासून जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. शहरे आणि गावांत पाणी तुंबले आहे. त्यामुळे सर्व जलमय झाल्यासारखे दिसत आहे. काही समाजकंटक या संकटाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकून अफवा पसरवत आहेत. 

महाडजवळ असलेल्या मोहोप्रे गावाजवळील एक ब्रिटिशकालीन पुलावरील डांबरी भागाला तडे गेले आहेत. ही स्थिती दोन वर्षांपासून आहे. त्याची पाहणी महामार्ग आणि बांधकाम विभागाने केली आहे. मात्र काही समाजकंटकांनी या दुरावस्थेची छायाचित्रे टाकून महाड शहरात घबराट पसरवली आहे. असाच संदेश आंबेत पुलाबाबत पसरवला आहे. 

आंबेत पूल पडल्याची अफवा पसरवली. आंबेत, टोळ, दादली हे पूल धोकादायक स्थितीत असले, तरी या ठिकाणी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. मात्र ऐन मुसळधार पावसात रात्री हे संदेश प्रसारित झाल्याने घबराट पसरली आहे. 

काही समाजकंटकांनी सर्व धरणे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे दरवाजे उघडल्याचे संदेश फिरत होते. भोर अणि कोयना या दूरच्या धरणाचे पाणीही महाड परिसरात आल्याचा जावईशोधही अनेकांनी लावला. सावित्री नदीतील मगरी सोलापूर, सांगली आणि महामार्गावर आल्याची माहिती देणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या होत्या. 

या अफवांमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दखल घेऊन आंबेत पूल सुरक्षित असल्याची माहिती दिली. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 अन्वये कारवाई करण्याचे संकेत दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumors flood after flood