मुंबईचे बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याची अफवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पुरानंतर आता कुठे सावरत असतानाच काही समाजकंटकांनी समाज माध्यमांवर बारावी धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहे. तसेच बारवी धरणाचे देखील दरवाजे उघडले जाणार आहेत. अशा आशयाचे खोटे मेसेज पसरवण्यास सुरुवात केली आहे.

बदलापूर : गेल्या आठवड्याभरात बदलापूरकरांनी अनुभवलेल्या पुरानंतर आता कुठे सावरत असतानाच काही समाजकंटकांनी समाज माध्यमांवर बारावी धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहे. तसेच बारवी धरणाचे देखील दरवाजे उघडले जाणार आहेत. अशा आशयाचे खोटे मेसेज पसरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे आदी परिसरातील सखल भागात राहणारे नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. आणि हे नागरिक बदलापुरात राहणाऱ्या अनेक आपल्या नातेवाईक, मित्र - मंडळींना फोन करून बारवी धरणाचे दरवाजे उघडले आहेत का? याबाबत विचारणा करत आहेत.

मुळात बारावी धरणाचे दरवाजे इतक्या लवकर उघडणे शक्य नाही. बारवी धरण अद्यापही 30% भरणे बाकी आहे. त्यामुळे अशाप्रकारे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी केले आहे. तसेच बदलापुरातील उल्हास नदीवर असलेले बॅरेज धरण हे अत्यंत छोटा बंधारा असून या बंधाऱ्याला कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. त्यामुळे खोटे मेसेज पसरवणाऱ्या समाजकंटकांनाची माहिती तातडीने आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तसेच असे खोटे मेसेज पसरवणाऱ्यांचा ठाणे सायबर सेल शोध घेत असून संबंधितांवर लवकरच अटक करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumors of opening of Barvi dam gates at Mumbai