अर्ध्या किमतीत वाहन खरेदीची अफवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अर्ध्या किमतीत कार विकल्या जाणार असल्याची अफवा पसरल्याने त्यांच्या खरेदीसाठी कर्नाळा अभयारण्य परिसरातील एका गोदामात ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी घडलेल्या घटनेने समाजमाध्यमांवर व्हायरल हाेणाऱ्या पोस्टची खातरजमा न करता त्यावर विश्वास ठेवणे किती हास्यास्पद ठरू शकते याची प्रचीती अाली.  

मुंबई : समाजमाध्यमावर कधी काय अफवा पसरेल आणि तिचे रूपांतर एखाद्या मोठ्या घटनेत कसे होईल, हे सांगता येत नाही. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा  कर्नाळ्यात पाहायला मिळावा. अर्ध्या किमतीत कार विकल्या जाणार असल्याची अफवा पसरल्याने त्यांच्या खरेदीसाठी कर्नाळा अभयारण्य परिसरातील एका गोदामात ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गर्दी वाढतच असल्याने नियंत्रण मिळवण्यासाठी गोदाम मालकास चक्क पोलिसांना पाचारण करावे लागले. शुक्रवारी (ता. १) सकाळी घडलेल्या घटनेने समाजमाध्यमांवर व्हायरल हाेणाऱ्या पोस्टची खातरजमा न करता त्यावर विश्वास ठेवणे किती हास्यास्पद ठरू शकते याची प्रचीती अाली.  

पनवेल, नवी मुंबई अादी परिसरात पुराच्या पाण्यात भिजलेली चारचाकी वाहने अर्ध्या किमतीत विकण्यास ठेवली असल्याचा मेसेज समाजमाध्यमावर वाऱ्यासारखा पसरला. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी अनेक भागातील गोदामांमध्ये पाणी भरल्याने साहित्याची नासाडी झाली होती. अशाच एका गोदामात ठेवण्यात आलेली वाहने पुराच्या पाण्यात बुडाल्याने त्यांची विक्री १ नोव्हेंबरपासून ४५ टक्के सवलतींच्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती समाजमाध्यमाद्वारे पसरली. त्याबद्दल कळताच कर्नाळा परिसरात असलेल्या एका नामांकित वाहन कंपनीच्या गोदामावर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणात आणणे गोदाम चालकांना शक्‍य न झाल्याने त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. गोदाम मालकाने वाहनविक्री करण्यासाठी अशी कोणतीही सवलत देण्यात आल्याच्या वृत्ताचे खंडन केले असून, अशी कोणतीही सवलत जाहीरच केली नसल्याचे सांगितल्याने अनेकांचा हिरमाेड झाला.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी 
अाजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजमाध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा समोर आला अाहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumors of a vehicle purchase at half price