जैवविविधता पाहण्यासाठी गर्दी

शरद वागदरे  
मंगळवार, 7 मे 2019

बच्चे कंपनीलाही मे महिन्याची सुट्टी लागली आहे. त्यामुळे ऐरोली येथील सागरी जैवविविधता परिचय केंद्रास भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

वाशी -  बच्चे कंपनीलाही मे महिन्याची सुट्टी लागली आहे. त्यामुळे ऐरोली येथील सागरी जैवविविधता परिचय केंद्रास भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. खाडीसफरीला पर्यटक आणि अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बोठे यांनी सांगितले.

ठाणे खाडीतील जैवविविधतेची माहिती घेण्याची आणि पक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निरीक्षण करण्याची संधी जिज्ञासूंना मिळत आहे. ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्रात नौकाविहारालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रोहित पक्ष्यांचे दर्शन व खाडीसफरीला पक्षिनिरीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी १ फेब्रुवारीपासून नौकाविहार सुरू झाला असून २४ आसनी एस. बी. फ्लेमिंगो बोट; तर विशिष्ट गटांसाठी प्रीमियम बोट सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक नागरिक, पर्यटनप्रेमी या ठिकाणी भेट देत आहेत. सागरी जैवविविधता केंद्रामध्ये एप्रिल २०१७ पासून मार्च २०१९ पर्यंत ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. सागरी जैवविविधता केंद्रामध्ये नवी मुंबईसह, मुंबई व ठाणे उपनगरातील पर्यटक येत आहे. सागरी जैववैविधता केद्रांची जनजागृती करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनीही कंबर कसली आहे. गेट ऑफ इंडिया, वाशी टोल नाका, नॅशनल पार्क, सीबीडी बेलापूर या ठिकाणी होर्डिंग्सही लावले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बोठे यांनी सांगितले. 

रोज ३० ते ५० पर्यटक
रोज भरती-ओहोटीनुसार एक किंवा दोन फेऱ्या होत आहेत; तर या ठिकाणी २४ आसनी बोट असून बोटींतून दररोज ३० ते ४८ पर्यटक प्रवास करतात. २४ आसनी बोटीसाठी प्रति व्यक्ती ३०० ते ४०० रुपये आकारले जात आहेत. प्रीमियम बोटीसाठी सात जणांच्या गटाला सहा हजार रुपये शुल्क आकारले जात आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बोठे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rush to biodiversity