नवी मुंबईची होणार बजबजपुरी! 

सुजित गायकवाड
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नवी मुंबई : सिडको काही वर्षांत नवी मुंबई परिसरात तब्बल 90 हजार घरे बांधणार आहे. त्यापैकी हजारो घरे चक्‍क रेल्वेस्थानकांच्या प्रांगणात (फोरकोर्ट परिसर) बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकांमागील मूळ हेतूला हरताळ फासला जाऊन भविष्यात शहर बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

नवी मुंबई : सिडको काही वर्षांत नवी मुंबई परिसरात तब्बल 90 हजार घरे बांधणार आहे. त्यापैकी हजारो घरे चक्‍क रेल्वेस्थानकांच्या प्रांगणात (फोरकोर्ट परिसर) बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकांमागील मूळ हेतूला हरताळ फासला जाऊन भविष्यात शहर बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

सिडकोने नवी मुंबईसह उरण-पनवेलमध्ये पुन्हा वेगात घरे उभारणीस सुरुवात केली आहे, परंतु मोक्‍याचे भूखंड आतापर्यंत विकसकांच्या घशात गेले आहेत. त्यामुळे नवीन घरांसाठी भूखंड कमी पडू लागले आहेत. यासंदर्भात माजी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. दरम्यानच्या काळात यासाठी रेल्वेस्थानकांतील मोकळ्या जागेचा वापर घरे बांधण्यासाठी करण्याचा विचार पुढे आला. 

सिडकोने नवीन घरांच्या प्रकल्पासाठी जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर आणि खांदेश्‍वर रेल्वेस्थानकांतील प्रांगणांचा विचार केला आहे. सिडकोने नवी मुंबई वसवताना रेल्वेस्थानकांचे नियोजन केले होते. त्या वेळी स्थानकांचा खर्च वसूल करण्यासाठी या प्रांगणात शहराच्या व रेल्वेस्थानकांच्या सौंदर्यात भर घालतील अशी वैशिष्ट्यपूर्ण वाणिज्य संकुले उभारण्याचे नियोजन केले होते. त्यालाच हरताळ फासण्यात येत आहे. 
विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात येणार असल्याने दाटीवाटीने इमारती उभ्या होणार आहेत. 

नवी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. नवीन स्थानके उभी राहिली आहेत. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यात आता या परिसरात नवीन गृहप्रकल्प उभे राहिल्यानंतर भर पडणार आहे. पार्किंग आणि रस्त्यांवर ताण वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या ठिकाणी सिडकोने भविष्यातील लोकवस्ती लक्षात घेता रुंद रस्ते आणि पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत काही तज्ज्ञांनी वर्तवले आहे. तसेच ही घरे रेल्वेस्थानकांसारख्या मोक्‍याच्या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याने ती परवडणारी असतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे सिडकोची ही भरारी वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. 

सिडकोचा 90 हजार घरे उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र घरे उभारण्यासाठी रेल्वेस्थानकांवरील प्रांगणांची निवड केली आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हा प्रकल्प तज्ज्ञ नियोजनकर्त्यांनी तयार न करता प्रशासकांनी तयार केला आहे. त्यामुळे आधी घोषणा व नंतर जागेची शोधाशोध होत असल्याने मूळ हेतू बाजूला राहिला आहे. हे राज्यकर्त्यांचे नियोजन आहे, नियोजनकर्त्यांचे नियोजन नाही. 
- दिनकर सामंत, माजी मुख्य शहर नियोजनकार, सिडको. 

शहरातील गरीब व गरजूंना परवडणारी घरे मोक्‍याच्या ठिकाणी उभारण्यासाठी रेल्वेस्थानकांच्या जागांची निवड केली आहे. लोकांना चांगली घरे देण्याचा सिडकोचा हेतू आहे. 
- वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको. 

Web Title: Rush will be in New Mumbai