घातपातामुळे ग्रीडफेल्युअर थिअरीवर विश्वास ठेवायलाच हवा; भाजपनेत्याकडून उर्जामंत्र्यांची खिल्ली

कृष्ण जोशी
Wednesday, 14 October 2020

कायम जातीय विचारांमुळे डोक्यात अंधार असलेले ग्रीडफेल मंत्री अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. 

मुंबई  ः परवा महामुंबई परिसरात झालेले ग्रीडफेल्युअर हे घातपातामुळे झाले या उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विधानावर विश्वास ठेवायलाच हवा, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. कायम जातीय विचारांमुळे डोक्यात अंधार असलेले ग्रीडफेल मंत्री अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. 

EXCLUSIVE : सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेहाल; जेवणासह राहण्याची सोय नाही; एसटीच्या आवारात झोपूनच काढताहेत रात्र

या ग्रीडफेल्युअरमागे घातपात आहे, असे विधान आज उर्जामंत्र्यांनी केले आहे. त्या विधानावर विश्वास ठेवावाच लागेल, मात्र या एवढ्या मोठ्या घातपाताची पुसटशी कल्पनाही राज्याच्या गृहखात्याला आली नाही. त्यामुळे प्रथम गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा द्यावा, अशा शब्दांत भातखळकर यांनी मंत्र्यांची टर उडवली आहे. 

ग्रीडफेल्युअर मागे घातपात या उर्जामंत्र्यांनीच सांगितल्याने त्यांच्या विधानावर विश्वास ठेवायलाच हवा. या घातपातामुळे दोघा जणांचे जीव गेले, लाखो लोकांचे प्रचंड हाल झाले, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, एवढी हानी या ग्रीडफेल्युअर मुळे झाली. त्यामुळे खरेतर या घातपाताची चौकशी करण्याआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा द्यायला हवा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

मुळात या ग्रीडफेल्युअरमागे घातपात आहे हे उर्जामंत्र्यांना केव्हा कळले हा मुख्य प्रश्न आहे. त्यांना हे आधीच कळले असेल तर त्यांनी त्याची कल्पना त्यांनी गृहमंत्र्यांना दिली का, याचाही खुलासा राऊत यांनी केला पाहिजे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sabotage must believe in gridfailure theory BJP leader mocks energy minister