सचिन अहिर, सुनील शिंदे यांचे होणार पुनर्वसन?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी मंत्री सचिन अहिर आणि माजी आमदार सुनील शिंदे यांचे पुनर्वसन होण्याची दाट शक्‍यता आहे.

मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी मंत्री सचिन अहिर आणि माजी आमदार सुनील शिंदे यांचे पुनर्वसन होण्याची दाट शक्‍यता आहे. आदित्य यांच्यासाठी या दोघांनी निवडणुकीत खूप परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या परिश्रमाचा आणि आपली वरळीची जागा सोडल्याचा योग्य तो मोबदला त्यांना 'मातोश्री' देईल, अशी चर्चा आता वरळी मतदारसंघात सुरू आहे. 

राज्यात आघाडी सरकारमध्ये अहिर हे गृहनिर्माण मंत्री होते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणीकीत ते पराभूत झाले. इंटकशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ते अध्यक्ष असून, राज्यव्यापी असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या मोठ्या संघटनेचेही ते अध्यक्ष आहेत.

राष्ट्रीय मिल मजदूर संघात सक्रीय झाल्यानंतर ते राजकारणात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षातून त्यांची राजकीय सुरवात झाली. 2014 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आली. अहिर हे मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बरीच वर्षे होते. राष्ट्रवादीने मुंबईला मराठी चेहरा दिला. सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील आमदार होते. त्यापूर्वी ते याच भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

वरळी हा विभाग मुंबईतील मध्यवर्ती आहे. या भागातील झपाट्याने होणारा पुनर्विकासावर नियंत्रण रहावे, या उद्देशाने आदित्य यांच्याकडे हा मतदारसंघ सोपविण्यात आल्याचे समजते. 

अहिर हे निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहिर यांना महत्वाची जबाबदारी देण्यात येईल, हे पाहूनच त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला असल्याचे मत व्यक्त केले होते.

अहिर यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या विविध पदांवर सामावून घेतले आहे. शिंदे यांनी आपला मतदारसंघ आदित्य यांच्यासाठी सोडला आहे. त्यामुळे अहिर आणि शिंदे यांचे पुनर्वसन होण्याची शक्‍यता आहे. दिवाळीनंतर सरकार बनविण्याच्या हालचाली वेगाने सुरू होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Ahir and Sunil Shinde may get rehabilitation