दही हंडीला सुरक्षा कवच गिर्यारोहणाचे

givinda
givinda

मुंबादेवी : दही हंडीचा उत्सव जवळ आला की 'गोविंदा रे गोपाळा'चा गजर करीत थिरकणारी पावले .... वाजंत्री थांबविण्याचा इशारा करीत आकाशात लटकणाऱ्या दही हंडी खाली जमून थरांचा अंदाज घेत..... बजरंग बली की जय अशी ललकारी देत..... एकमेकांच्या खांद्यावर उभे राहणारे गोविंदा ..... खांद्यावरचे वजन न पेलल्यामुळे थरथरत कोलमडलेल्या गोविंदामुळे कोसळणारा मनोरा .... वेदनांनी विव्हळणाऱ्या जखमी गोविंदांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्यासाठी  उडालेली धावपळ असे अनेक प्रकार दही हंडी उत्सवात घडत असतात. असे अपघातांचे प्रकार कमी करून दही हंडी उत्सवाचा आनंद व्दिगुणीत करता यावा यासाठी गिर्यारोहकांनी गिर्यारोहणाच्या माध्यमातून गोविंदासाठी "सुरक्षा कवच" देऊ केले आहे. 

डोंगर दऱ्यातील अपघातांत गिर्यारोहकांचे सहकार्य किती अनमोल असते हे नुकत्याच आंबेनळीच्या  घाटात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर जगासमोर आले आहे; आणि आता त्याच पठडीतील गिर्यारोहक पुन्हा एकदा, दही हंडीचे थर रचताना मानवी मनोरे कोसळून जखमी होणाऱ्या गोविंदाना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येत आहेत. राज्य शासनाने अलीकडेच दही हंडी उत्सवाला खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच निरनिराळ्या विमा कंपन्या दही हंडी उत्सवात जखमी होणाऱ्या गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. हे विमा संरक्षण अर्थातच गोविंदांचे अपघात झाल्यावर मिळणारे आहे. परंतु गिर्यारोहणाच्या माध्यमातून मिळणारे संरक्षण गोविंदांचे अपघात होऊच नयेत यासाठी आहे. 

गिर्यारोहणाच्या माध्यमातून गोविंदाना सुरक्षा कवच देण्याची कल्पना २०११ साली ज्येष्ठ गिर्यारोहणतज्ज्ञ श्री. रत्नाकर कपिलेश्वर यांच्या संकल्पनेतून सर्वात प्रथम साकारली आहे. दही हंडीच्या दोराला अथवा त्याच्यावर दुसरा दोर बांधून त्यावर पुली लावून बिले पद्धतीने दही हंडीच्या वरच्या थरातील दोन ते तीन गोविंदांना संरक्षण देता येते. त्यामुळे दहीहंडीचा मानवी मनोरा कोसळला तरी वरच्या थरातील गोविंदा खाली न कोसळता त्याला वरच्यावर लोम्बकळत ठेऊन नंतर सुखरूपपणे खाली घेता येते. अश्या रितीने अपघातांची संख्या कमी होऊन वरच्या थरातील गोविंदाना  १०० टक्के संरक्षण मिळणार आहे. कोणतेही साहस करताना योग्य ती काळजी घेणे यात गैर कांहीच नाही, उलट त्या साहसाचा आनंद घेण्यासाठी जिवंत राहणे आवश्यक आहे असे सांगून श्री. कपिलेश्वर याबाबत अधिक माहिती देताना पुढे म्हणतात की, "याप्रकारे गोविंदांची काळजी ही दही हंडी आयोजकांनी घ्यावयाची आहे आणि त्यासाठी आयोजकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. अश्या पद्धतीने संरक्षण देण्याचा  एक फायदा पर्यायाने आयोजकांनाच होणार आहे कारण दही हंडीचे थर लावताना वरच्या थरातील गोविंदांना खाली पडून जखमी होण्याची भीती नसल्याने अधिक आत्मविश्वासाने उंच थर रचता येतील आणि खऱ्या अर्थाने दही हंडी उत्सवाचा  आनंद निर्भेळपणे लुटता येईल. 

यावर्षी दही हंडी उत्सवात थरांचे निर्बंध नसून फक्त वयोमर्यादेची अट असल्याने उंच थर लावण्याची चुरस नक्कीच वाढणार आहे; त्यामुळे मानवी मनोरे रचताना अपघात होण्याची शक्यताही वाढणार आहे. गिर्यारोहणाच्या माध्यमातून गोविंदांना मिळणाऱ्या या सुरक्षा कवचाचे महत्व अधिक असणार आहे. म्हणूनच श्री. कपिलेश्वर यांनी गोविंदा पथकांना असे आवाहन केले आहे की ज्या ज्या ठिकाणी अशाप्रकारचे गिर्यारोहणाच्या माध्यमातून दिले जाणारे सुरक्षा कवच उपलब्ध असेल त्या त्या ठिकाणी गिर्यारोहकांकडून योग्य पद्धतीने हार्नेस घालून दोराच्या सहाय्याने आपल्या गोविंदांना संरक्षण द्यावे. ते पुढे असेही म्हणतात की,"याप्रकारे गोविंदांना संरक्षण पुरविणारे गिर्यारोहक व त्यांचे सहकारी अनुभवी असावेत, वापरण्यात येणारी गिर्यारोहणाची साधने चांगल्या प्रकारची असावीत, शक्य असल्यास स्टील रोपचा उपयोग करावा जेणेंकरून कांही बिकट प्रसंग उदभऊन गिर्यारोहण क्षेत्र नाहक बदनाम होता कामा नये." यामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल अधिक माहिती देण्यासाठी या सुरक्षा कवचावर आधारित एक चित्रफीत फेसबुक व यु ट्यूबवर "दही हंडी सुरक्षा कवच" या सदराखाली उपलब्ध आहे. ज्या आयोजकांना गोविंदांना अशाप्रकारचे संरक्षण द्यावयाचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी श्री. कपिलेश्वर यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९८२०७४०७७९ अथवा ९८६९२०९०७२ यावर संपर्क साधावा. 

यावर्षी येणाऱ्या दही हंडी उत्सवात श्री. कपिलेश्वर व त्यांचे गिर्यारोहक सहकारी दही हंडी फोडणाऱ्या गोविंदांची  काळजी घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी सर्व गिर्यारोहक  सहकाऱ्यांनाही आवाहन केले आहे की अश्याप्रकारे गिर्यारोहणातील बिले तंत्राचा उपयोग करून आपापल्या विभागातील आयोजकांमार्फत तेथे येणाऱ्या पथकांना गिर्यारोहणाचे सुरक्षा कवच पुरवावे आणि दही हंडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com