कास्टिंग यार्डसाठी सहाराची जमिन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

एमएसआरडीसी पाच वर्षासाठी भाडेतत्वावर घेणार?

मुंबई : वर्सोवा वांद्रे सी लिंकच्या कास्टिंग यार्डसाठी ओशिवरा परिसरातील सहाराची जमिन पाच वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्याचा महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ (एमएसआरडीसी) करत आहे. जुहु समुद्रकिना-यावर कास्टिंग यार्ड उभारण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यांत नाकारली होती. त्यानंतर एमएसआरडीसीने नव्या जागेचा शोध सुरू केला होता. ओशिवरा परिसरात सहारा समुहाची रिकामी जागा भाडेतत्वावर घेण्याबाबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

वर्सोवा वांद्रे सी लिंक एमएसआरडीसी बांधत आहे. यासाठीच्या कास्टिंग यार्डसाठी जुहू समुद्रकिनाऱ्यावरची जागा योग्य होती. परंतु पर्यावरण हानीच्या मुद्यावर या कास्टिंग यार्डचे काम थांबविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबईत अन्यत्र जागा शोधण्यास सुरूवात केली होती. पाच-सहा ठिकाणे निश्‍चितही झाली होती. या जागा 8 ते 10 किमीच्या पट्ट्यात होत्या. कास्टिंग यार्डसाठी लागणारे सामान वस्तू आणि येथे तयार होणा-या सामानाची वाहतूक करण्याच्या दृष्टीने या जागा खर्चीक होत्या. त्यामुळे जुहू किंवा या सी लिंकच्या पट्ट्यांतच समुद्रकिनाऱ्यालगतच्या जागी मिळवण्याबाबतचा प्रयत्न सुरू होते. 

सध्याच्या जागेपासून सहाराची जमिन दीड किलोमीटर अंतरावर असून, इतर जागांच्या तुलनेत यासाठी वाहतूक खर्च कमी येईल, त्यामुळे सदर जागा अंतिम करण्याबाबत सहाराशी बोलणे सुरू आहे. पाच वर्षाच्या भाडेकरारावर ही जमिन कास्टिंग यार्डसाठी वापरण्याचा विचार असून, आर्थिक गणिते जुळविण्याबाबतच्या वाटाघाटी सुरू असल्याचे एमएसआरडीसीचे कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार यांनी सांगितले. 

जुहु परिसरातील कास्टिंग यार्ड अवैध पद्धतीने बांधले जात असून, पर्यावरण विषयक परवानगी नसतानाही काम सुरू असल्याबाबत पर्यावरणवादी कार्यकर्ते झोरु बोथना यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायमुर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने कास्टिंग यार्डच्या काम बंदीचे आदेश दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saharas Land for casting yard