संमेलन नगरीतून...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

डोंबिवलीच्या सावळाराम म्हात्रे संकुलात भरलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह प्रचंड आहे. संमेलन नगरीतील ही क्षणचित्रे...

डोंबिवलीच्या सावळाराम म्हात्रे संकुलात भरलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह प्रचंड आहे. संमेलन नगरीतील ही क्षणचित्रे...

विलंबाचे ग्रहण...
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या मुख्य सभागृहात झाले. सकाळी ९ ची वेळ असताना १० वाजले तरी सत्र सुरू झाले नव्हते. सभागृहातील वातानुकूलित यंत्रणाही सुरू नव्हती. त्यामुळे उपस्थितांना घुसमटल्यासारखे वाटू लागले. उशिराने सुरू झालेले हे सत्र साहजिकच उशिरा संपले आणि पुढील कार्यक्रमही लांबले. शुक्रवारचे मूळ भाषणही उशिरा सुरू झाले. याबाबत रसिकांत चर्चा रंगली होती. 

विजेचा लपंडाव...
सावित्रीबाई फुले नाट्यगृहात वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. त्यामुळे रसिकांचा हिरमोड होत होता. संमेलनापूर्वी सभागृहातील व्यवस्थांची दुरुस्ती करण्याची मागणी रसिकांनी केली. महापौरांनीही दुरुस्तीच्या सूचना केलेल्या असतानाही ती झाली नसल्याचे जाणवले. 

 विद्यार्थी वेठीस...
संमेलनात गर्दी दिसावी, यासाठी आयोजकांनी विविध शाळांशी संपर्क साधून कार्यक्रमाची आधीच सूचना दिली होती. काही शाळांना वेळा दिल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थी आणि शिक्षक संमेलनाच्या ठिकाणी येत होते. मुलांसाठी दुसऱ्या दिवशी दोन विशेष परिसंवाद होते. त्यात विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील कार्यक्रमाला गर्दी नसल्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. अर्थविषयक परिसंवाद आणि युद्धस्य कथांच्या कार्यक्रमाला चांगली गर्दी होती. मुलांनी संमेलनाच्या प्रवेशद्वारावर सेल्फीचा मनसोक्त आनंद घेतला. 

पासवर्ड ‘आगरी युथ फोरम’
महोत्सवाच्या प्रसारणासाठी आलेल्या माध्यमांना मोफत वाय-फाय सुविधा होती. मात्र पहिल्या दिवशी वाय-फायचा पासवर्डच कुणाला माहीत नव्हता. त्यामुळे कुणी ‘मराठी’, कुणी ‘९०वे मराठी साहित्य संमेलन’, आदी पासवर्ड टाकून कनेक्‍ट होण्याचा प्रयत्न केला. कुणी म्हणे, ‘गुलाब वझे’ पासवर्ड टाका, म्हणजे कनेक्‍ट होईल. कुणीतरी ‘आगरी युथ फोरम’ हे पासवर्ड असल्याचे सांगितले. मात्र कोणाचा त्यावर विश्‍वास बसेना. अखेर तोच खरा पासवर्ड असल्याचे स्पष्ट झाले आणि गोंधळ थांबला. 

 पालिकेला श्रेय...
साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक ‘आगरी युथ फोरम’ असले तरी संमेलनाला महापालिकेने विशेष सहकार्य केले आहे. सुमारे ५० लाखांचा निधी आणि पालिकेची यंत्रणा येथे राबत आहे. तरीही संमेलनात श्रेय मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालिकेला प्रसिद्धिपत्रक काढावे लागले. 

Web Title: sahitya sammelan nagari