समस्यांमध्ये संधी शोधा - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

समोर आलेल्या समस्यांचे संधीत रूपांतर करून उत्तरोत्तर यशाची नवीन शिखरे गाठा, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

मुंबई - ‘‘देशातील गरिबी, बेकारी, उपासमारी दूर करण्यासाठी उद्यमशीलता सातत्याने वाढलीच पाहिजे. मात्र, प्राथमिक यशाने हुरळून जाऊ नका. समोर आलेल्या समस्यांचे संधीत रूपांतर करून उत्तरोत्तर यशाची नवीन शिखरे गाठा,’’ असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

उद्यमशीलता जपून समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या ६० सेवाव्रतींना ‘सकाळ अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने गौरव करताना ते बोलत होते. विलेपार्ले येथील सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेलात शुक्रवारी (ता. १) सायंकाळी झालेल्या या समारंभात गडकरी बोलत होते. गडकरी यांनी या उद्योजकांच्या ध्येयनिष्ठेची, त्यांच्या त्यागाची या वेळी प्रशंसा केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविणाऱ्या या उद्योजकांना पुरस्कार देऊन त्यांच्या यशाला समाजमान्यता देणाऱ्या ‘सकाळ वृत्त समूहा’चेही गडकरी यांनी विशेष कौतुक केले. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात २९ टक्के, तसेच देशाच्या एकूण निर्यातीत ४५ टक्के वाटा या अशा लहान उद्योजकांचा असतो. या उद्योजकांनी आतापर्यंत ११ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांचे काम उल्लेखनीय आहे. ‘सकाळ’ने या पुरस्कारांमार्फत तुम्हाला दिलेली मान्यता म्हणजे विकासासाठी तुम्ही दिलेल्या कामाची पोचपावती आहे, असेही गडकरी या वेळी म्हणाले. 

उद्योगांच्या विकासासाठी उद्योजकांची दूरदृष्टी, निर्णयक्षमता, संघभावना, नव्या कल्पना आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. कोणीही आपली जात, धर्म, भाषा, पंथ यामुळे मोठा होत नाही, तर गुणवत्तेमुळेच मोठा होतो. आज तुम्हा उद्योजकांना ‘सकाळ’ने दिलेला पुरस्कार हे प्राथमिक यश आहे. त्याचा अहंकार बाळगू नका किंवा त्याने हुरळूनही जाऊ नका. आपण अद्याप परिपूर्ण नाही, आपण अपूर्णांक आहोत, हे लक्षात ठेवून सतत काम करा. यापुढेही अडचणींचे संधीत रूपांतर करून अशीच उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल करा, असा यशाचा कानमंत्रही गडकरी यांनी दिला.

‘सकाळ वृत्तसमूहा’ने स्थापनेपासून जी मूल्ये मानली, रुजवली, त्यांचा या कार्यक्रमाशी संबंध आहे. समाजात जे चांगले होते, त्याला पाठिंबा देण्याचे वृत्तपत्राचे धोरण आहे. ते वेगवेगळ्या टप्प्यांवर काळाशी सुसंगत पद्धतीने ‘सकाळ’ करीत आहे, असे ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले. चांगल्या मार्गाने संपत्ती कमावणे हा राष्ट्र उभारणीचा भाग आहे, असे आम्ही मानतो. ‘सकाळ’च्या याच मूल्यव्यवस्थेचा हा धागा या पुरस्कार समारंभाशी जोडला आहे, असे ते म्हणाले.

पुरस्कारविजेत्या उद्योजकांकडून पुढील कारकिर्दीसाठी प्रेरणा घेण्यासाठी मी येथे आलो. हल्ली चित्रपटसृष्टीत सत्य कथांवर भर दिला जात आहे. ‘सकाळ’ने या सर्व उद्योजकांची यादी मला द्यावी. त्यांच्या मदतीने पुढील ५० वर्षे त्यावर आधारित मी चित्रपटांची निर्मिती करू शकेन.
- श्रेयस तळपदे, अभिनेता

‘लोकशाहीतील चौथ्या स्तंभाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणारी फारच कमी वृत्तपत्रे देशात आहेत. त्यात ‘सकाळ वृत्तपत्र समूह’ आघाडीवर आहे,’ सध्या देशात मानसिकदृष्ट्या मंदीचे वातावरण असतानाही या ६० उद्योजकांनी हा सन्मान मिळविला आहे, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. त्यांचे कठोर परिश्रम, चिकाटी यामुळेच ते या पुरस्कारापर्यंत पोचले. या उद्योजकांचा सन्मान करून ‘सकाळ’ने त्यांना प्रोत्साहन दिले आहे.
- अमिताभ शर्मा, ‘ग्रुप एम’चे नॅशनल प्रिंट व रेडियो हेड

कुटुंबीय भारावले
या सोहळ्यात ६० पुरस्कारार्थींचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेता श्रेयस तळपदे, जाहिरात क्षेत्रातील उद्योजक अमिताभ शर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आल्याने पुरस्कारार्थींचे कुटुंबीयही भारावून गेले होते. सायंकाळी मुसळधार पाऊस असतानाही पुरस्कारविजेते आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या उत्साहात सोहळ्यासाठी दाखल झाले.

मानाचा भगवा फेटा
पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची नोंदणी करण्यात आली. नोंदणी होताच पुरस्कारार्थींना मानाचा भगवा फेटा बांधण्यात आला. फेटा बांधल्यावर प्रत्येकाने कुटुंबासोबत छायाचित्र काढले.

स्वप्नजा लेले यांच्या गायनाने रंगत
पार्श्‍वगायिका स्वप्नजा लेले यांच्या गाण्याने सभागृहातील वातावरण अधिकच मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालक योगेश देशपांडे यांनी खास शैलीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी गणरायाची प्रतिमा देऊन स्वागत केले; तर ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी ‘ग्रुप एम’चे नॅशनल प्रिंट व रेडियो हेड अमिताभ शर्मा यांचे स्वागत केले.

नियोजनबद्ध व्यवस्थापन
हॉलमध्ये ठिकठिकाणी ‘अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र’ असे लागलेले स्टॅंडी, पुरस्कारार्थींना संवाद साधण्यासाठी खास केलेला मंच सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. येथे छायाचित्र काढून घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. भव्य हॉल, आसनव्यवस्था, नियोजनबद्ध व्यवस्थापन, यामुळे पुरस्कारार्थींच्या आनंदात अधिकच भर पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal achievers of maharashtra