
Sakal Premier Awards 2023 : ‘सन मराठी’वर रविवारी रंगणार ‘सकाळ प्रीमियर सोहळा’!
मुंबई : सदाबहार गीतांवरील नृत्याचे विविध आविष्कार, सोबत अनोखी अशी स्टॅण्डअप कॉमेडी, दिमाखदार आणि देखण्या सूत्रसंचालनाची जोड आणि त्यामध्ये हरखून गेलेली कलाकार मंडळी अन् तंत्रज्ञ अशा नेत्रदीपक वातावरणात पार पडलेल्या ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’ची जादू आता रसिक प्रेक्षकांना ‘सन मराठी’ वाहिनीवर अनुभवता येणार आहे.
चित्रपटसृष्टीतील कार्यकर्तृत्वाच्या गौरव सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी येत्या रविवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजता रसिकांना मिळणार आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स लि.’ सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.
‘सकाळ प्रीमियर सोहळ्या’चे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. पहिला सोहळा मुंबईत रवींद्र नाट्यगृहात पार पडला होता. दुसरा सोहळा पुण्यात रंगला. यंदाचा तिसरा सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. अत्यंत जोशात आणि दणक्यात झालेल्या सोहळ्याला मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सोहळ्यातील सहभाग उल्लेखनीय ठरला. मनोरंजनाचे उत्तम पॅकेज असलेल्या सोहळ्यात आपल्यावरही कौतुकाचा वर्षाव झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी सुखावून गेली होती. पुरस्कार स्वीकारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनोखे समाधान विलसत होते. यापुढेही यापेक्षा अधिक उत्तम कामगिरी करू, असेच भाव जणू त्यांचा चेहरा सांगत होता.
अभिनेत्री पूजा सावंत, नेहा महाजन, स्वामिनी वाडकर, मानसी नाईक, अमिता कुलकर्णी, अभिनेता पुष्कर जोग आणि रोहित शिवलकर यांनी नृत्यकौशल्य सादर करत कार्यक्रमात जोश भरला. अभिनेते संजय मोने यांनी सादर केलेल्या अनोख्या स्टॅण्डअप कॉमेडीने सभागृहात हास्याचे फवारे उडत होते. पुष्कर श्रोत्री आणि मृण्मयी देशपांडे यांच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे सोहळ्याला रंगत आली.
राजदत्त आणि प्रशांत दामले यांचा विशेष सन्मान
ज्येष्ठ दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू अर्थात राजदत्त आणि विक्रमादित्य अभिनेते प्रशांत दामले यांना सोहळ्यात विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. राजदत्त यांना ‘प्रीमियर जीवनगौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अभिनेते प्रशांत दामले यांना ‘प्रीमियर नाट्यसेवा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
रसिक प्रेक्षकांनी त्यांना आपल्या जागेवर उठून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. बक्षीस मिळण्याच्या अपेक्षेने मी कधी काम केले नाही; परंतु हे कौतुक मला नेहमीच स्फूर्ती देत राहील, अशा भावना राजदत्त यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केल्या. विक्रमादित्य प्रशांत दामले यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं... काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं,’ असे आयुष्याचे सार सांगणारे अलौकिक गाणे गाऊन उपस्थितांची दाद मिळविली.