'मुख्यमंत्री फडणवीसांनी माझ्या वडिलांची माफी मागावी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

अमली पदार्थ विरोधी शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सुहास गोखले यांचा बेबी पाटणकरशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्टमधून सुहास गोखले यांना क्लीनचीट देण्यात आली आहे.

मुंबई : प्रसिद्ध ड्रग माफिया बेबी पाटणकर प्रकरणातून दोषमुक्त झालेले माजी पोलिस अधिकारी सुहास गोखले यांचा मुलगा साकेत गोखले याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी माझ्या वडिलांची माफी मागावी, असे म्हटले आहे.

अमली पदार्थ विरोधी शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सुहास गोखले यांचा बेबी पाटणकरशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्टमधून सुहास गोखले यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. सुहास गोखले यांच्यासोबत गौतम गायकवाड, सुधाकर सारंग, ज्योतिराम माने आणि यशवंत पराटे यांच्यावरही आरोप झाले होते. मात्र या सगळ्यांना या आरोपातून दोषमुक्त करण्यात आले आहे. 

याविषयी साकेत गोखले यांने ट्विटरवर या पत्राविषयी लिहिताना म्हटले आहे, की निर्दोष सुटलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची सरकारने माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वडिलांची माफी अथवा दिलगीरी व्यक्त करतील अशी अपेक्षा ठेऊ शकतो का? माझ्या वडिलांना सहानुभूती मिळणार का? सुहास गोखले यांच्याविरोधात खोटे आरोप केले जात असतानाही गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. सुहास गोखलेंची निर्दोष सुटका झाल्यानंतर गेल्या चार वर्षात त्यांनी गमावलेला मान- सन्मान परत मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saket Gokhle open letter to CM Devendra Fadnavis