नौदलाच्या औषधांची बाजारात विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या एका बड्या कंपनीचाही समावेश आहे. 

मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या एका बड्या कंपनीचाही समावेश आहे. 

सरकारला थेट पुरवल्या जाणाऱ्या औषधांची विक्री खुल्या बाजारात करता येत नाही. हा औषधांचा साठा संबंधित विभागाच्या शिक्‍क्‍याने वितरित केला जातो. सैन्यदलाला पुरवलेली औषधे मुंबईत विक्रीसाठी आल्याची माहिती गेल्या आठवड्यात ‘एफडीए’च्या ‘इंटेलिजन्स ब्यूरो’च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी गेल्या बुधवारी भायखळ्यातील संकल्प सिद्धी टॉवरमधील निवान फार्मास्युटिकल्स या वितरकावर छापा घातला. तेथे संरक्षण व नौदलासाठी दिल्या जाणाऱ्या ‘सीटाग्लिप्टिन फॉस्फेट’ गोळ्या आणि ‘विण्डाग्लिप्टिन’ गोळ्या सापडल्या. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी त्या जप्त केल्या. या गोळ्यांच्या पाकिटांवर ‘ही औषधे संरक्षण व नौदलासाठी असून, विक्रीसाठी उपलब्ध नाहीत,’ असे लिहिलेले होते; मात्र संबंधित वितरकाने व्हाइटनरच्या मदतीने ते खोडल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. जप्त केलेली औषधे सुमारे १८ लाखांची आहेत. निवान फार्मास्युटिकल्सकडून ही औषधे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातही विकली गेल्याचे समजते. 

भायखळ्यातील कारवाईनंतर मुलुंड, सानपाडा, तळोजा, नवी मुंबईतील ऑनलाइन औषधविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या फार्मसी कंपनीच्या गोदामावर ‘एफडीए’ने छापे घातले. तेथेही संरक्षण व नौदलाचा शिक्का असलेल्या औषधांचा साठा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पाच जण ताब्यात
याप्रकरणी सोमवारीही ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे घातले असून, आतापर्यंत पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते; मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

संरक्षण, नौदलाच्या औषधांप्रकरणी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. याबाबत आताच काही माहिती देता येणार नाही. 
- डी. आर. गहाणे, सहआयुक्त, औषध विभाग, ‘एफडीए’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sales of Navy medicines on the market