अबब! 7-8 रुपयांची पुडी 100 रुपयांना, लॉकडाऊनदरम्यान तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

अनेक किराणा दुकानदार व पानटपरी चालक जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसोबत हे पदार्थही विकत असून हे घेण्यासाठी नागरिक चक्क रांगा लावत असल्याचे ही दिसून आले.

ठाणे :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री आणि सेवनावर बंदी असतानाही ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील महागिरी परिसरात अनेक किराणा दुकानदार व पानटपरी चालक जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसोबत हे पदार्थही विकत असून हे घेण्यासाठी नागरिक चक्क रांगा लावत असल्याचे ही दिसून आले. हा सर्व प्रकार समाज माध्यामावर व्हायरल होत आहे. अशात तंबाखुच्या पुडीला चांगलाच दर मिळत आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनही अदयाप कोणतीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महत्वाची बातमी यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना कोरोनासोबत 'या' परिस्थितीचा देखील करावा लागणार सामना?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंध म्हणून 19 मार्चपासुन पुढील आदेशापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. दंडनीय कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तरी देखील ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सकाळच्या सत्रात विविध जीवनावश्यक वस्तुंसोबतच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थही खरेदी केले जात आहेत. विशेष म्हणजे एरवी 7 ते 8 रुपयात मिळणाऱ्या पुडीसाठी तब्बल 70 ते 100 रुपये मोजावे लागत असल्याचे ही समोर आले आहे.

नक्की वाचा : डेंजर प्रकार ! वडा पाव खा, कोरोना पळवा... मुंबईत काहीही होऊ शकतं !

औषध दुकानात नशेच्या औषधांची विक्री
टाळेबंदीच्या काळात नशेबाजांनी नवनवे नशेचे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. फार्मासिस्टकडून छुप्यारितीने नशा येणाऱ्या औषधी गोळ्या विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वागळे इस्टेट भागातील शांतीनगरमधील एका औषध दुकानात 200 रुपयात ‘ट्रामाडोल अल्ट्रसेट’ या नशेच्या 15 गोळ्याचे पाकीट विकताना अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नुकतेच रंगेहाथ पकडले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात फार्मासिस्ट बिहारीलाल तेली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : प्रशासनाला सुनावलं, क्वारंटाईन करण्याबद्दल मुंबई हायकोर्ट म्हणतंय...  

पोलिस तस्करांच्या मार्गावर 
ठाणे पोलीस आयुक्तालयातील अनेक गल्लीबोळात सुरू असलेल्या नियमांच्या उल्लंघनाविषयी पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन येत आहेत.  त्यामध्ये छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या असंख्य तक्रारींचा समावेश आहे. मात्र, स्थानिक पोलिसांच्या हाती हे तस्कर लागत नसल्याचे दिसून येत आहे.

Sales of tobacco products even under lockdown  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sales of tobacco products even under lockdown