'समग्र शिक्षा अभियाना'चा फार्स

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - "समग्र शिक्षा योजने'अंतर्गत राज्यभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती देण्याची सक्ती शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांना केली आहे. ही माहिती भरण्यासाठी विद्यार्थीच उपलब्ध नसल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.

मुंबई - "समग्र शिक्षा योजने'अंतर्गत राज्यभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती देण्याची सक्ती शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांना केली आहे. ही माहिती भरण्यासाठी विद्यार्थीच उपलब्ध नसल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.

अशैक्षणिक कामाच्या वाढत्या ताणाबाबत शिक्षकांमध्ये कमालीचा संताप असताना समग्र शिक्षा अभियानाचे काम लावल्याने अनेक शिक्षक संघटनांनी या सक्‍तीचा विरोध केला आहे. दहावीचे प्रशिक्षण, "बीएलओ'ची कामे, शाळांमधील निकालांची गडबड सुरू असताना शिक्षण विभागाने 12 एप्रिल रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचा आदेश दिला.

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांवर आधारित पुस्तकांचा परिचय होण्यासाठी तब्बल दोन आठवड्यांहून अधिक काळ शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होते. हे प्रशिक्षण नुकतेच संपले. आता प्राधान्याने निकालाचे कामही मार्गी लावायचे आहे. त्यामुळे एका दिवसात कशी काय विद्यार्थ्यांची माहिती भरायची, असा प्रश्‍न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.

गोंधळात वाढ
विद्यार्थ्यांची माहिती 44 प्रकारांत भरायची असून, त्याची अंतिम मुदत 25 एप्रिल रोजी (आज) संपत आहे. परंतु इतर व्यस्त कामांमध्ये शिक्षकांना समग्र शिक्षा अभियानात माहिती भरण्यास पुरेसा वेळच मिळाला नसल्याने गोंधळ उडाला आहे. प्रशिक्षण काळात माहिती भरणे कठीण होते. त्यात आता परीक्षा संपल्याने विद्यार्थीच उपलब्ध नसल्याने प्रणालीत विद्यार्थ्यांची माहिती भरायची कशी, हा प्रश्‍न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.

शिक्षकांचा मानसिक छळ सुरू आहे. शिक्षक प्रचंड तणावात आहेत. सरल प्रणालीत विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध असताना ही माहिती नव्याने भरण्याचे काम कशाला दिले जात आहे.
- अनिल बोरनारे, सदस्य, शिक्षण परिषद

Web Title: samagra shiksha abhiyan student information teacher