राष्ट्रवादी-शिवसेनेत "दे दणादण' 

राष्ट्रवादी-शिवसेनेत "दे दणादण' 

नवी मुंबई - लोकसभा निवडणूक नजरेसमोर आल्याने नवी मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. पालिकेने ऐरोली येथे उभारलेल्या मंगल कार्यालय उद्‌घाटनाच्या वेळी आज या वातावरणाचा पहिला स्फोट झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले. खासदार राजन विचारे यांची वाट न पाहता महापौर जयवंत सुतार आणि आमदार संदीप नाईक यांनी मंगल कार्यालयाचे उद्‌घाटन केल्याचे निमित्त त्यासाठी ठरले. 

महापालिकेतर्फे शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांच्या प्रभागात जानकीबाई कृष्णा मढवी मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे. त्याचे शिवसेनेच्या नेत्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यासाठी शिवसेनेतर्फे मढवी यांनी सर्व तयारी केली होती. महापालिकेने कार्यक्रमाची पत्रिका छापली होती, तर मढवी यांनी शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींची नावे असलेली दुसरी पत्रिका छापली होती. सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते कधी नव्हे ते वेळेवर हजरही झाले होते; परंतु खासदार राजन विचारे वेळेत आलेच नाहीत. अखेर महापौर सुतार यांनी फीत कापून मंगल कार्यालयाचे उद्‌घाटन केले. त्यानंतर सभागृहात प्रवेश करून दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. या दरम्यान विचारे यांची वाट पाहत बसलेल्या एम. के. मढवी यांनी खासदार विचारे येण्याआधीच उद्‌घाटन का केले, असा जाब राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला. शिष्टाचारानुसार महापौर मोठे की खासदार मोठे यावर एकमेकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या; परंतु यात दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्यानंतर वाक्‌युद्धाचे पर्यवसान धक्काबुकीत झाले. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना केलेल्या धक्काबुक्‍कीत संदीप नाईक, जयवंत सुतार, अनंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी, करण मढवी आणि विनया मढवी आदींना धक्काबुक्‍की झाली. 

संदीप नाईक यांच्या वाहनाचे नुकसान 
मंगल कार्यालयात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांमध्ये भिडल्यानंतर कार्यकर्त्यांची आपापसात धक्काबुक्की सुरू झाली. एकमेकांना ढकलणारी गर्दी सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या तावडीत आमदार संदीप नाईक यांचे वाहन सापडले. त्यानंतर काही व्यक्तींनी त्या वाहनाच्या काचा फोडल्या. 

एकमेकांविरोधात तक्रारी 
धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी आणि विनया मढवी यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. 

एकाच कार्यालयाचे दोन वेळा उद्‌घाटन 
नवी मुंबई महापालिकेच्या मंगल कार्यालयाचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते फीत कापून उद्‌घाटन करण्यात आले; मात्र मध्येच गोंधळ झाल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते निघून गेले. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पुन्हा फीत कापून या वास्तूचे उद्‌घाटन केले. 

शांततापूर्ण तणाव 
मंगल कार्यालयात दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आपापसात भिडल्यानंतर कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात तणाव पसरल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे आणि बोनकोडे भागातील दुकाने व्यावसायिकांनी स्वतःहून बंद केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात संध्याकाळपर्यंत तणावपूर्ण शांतता होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com