
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना एकीकडे न्यायलायचा दिलासा अन् दुसरीकडे CBIचे समन्स
मुंबई : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. वानखेेडेंची सीबीआयकडून 24 मेला पुन्हा चौकशी होणार आहे. दिल्ली सीबीआय अधिकाऱ्यांची टीम मुंबईतील बीकेसी कार्यालयात चौकशी करणार आहे.
तत्पूर्वी समीर वानखेडे यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा देत 8 जूनपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र केससंदर्भातले पुरावे माध्यमांमध्ये शेअर न करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
सीबीआयला 3 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले, त्यानंतर 5 दिवसांनी, म्हणजेच 8 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून 25 लाख रुपये मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने केला आहे.
कोर्टाकडून दिलासा
न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सीबीआयच्या वकिलांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. समीर वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा यांचा युक्तिवाद हायकोर्टाने मान्य केला आहे. मात्र याचवेळी मीडिया ट्रायल होऊ नये याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
तपासासंदर्भात कोणतीही माहिती अथवा मेसेज देण्यास न्यायालयाने समीर वानखेडे यांना प्रतिबंध घातले आहेत. शिवाय चौकशी आणि तपासात सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश वानखेडे यांना दिले आहेत. कोर्टाने सीबीआयला 3 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून 8 जून रोजी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा कायम आहे.
रोज 5 तास चौकशी
समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. मागचे दोन दिवस समीर वानखेडे यांची सीबीआयकडून दररोज पाच तास चौकशी झाली आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करत दोन दिवस सीबीआय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. या दोन दिवसातील चौकशीचा अहवालही सीबीआयने हायकोर्टात सादर केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर समीर वानखेडेंना हायकोर्टाने अटकेपासून असलेलं संरक्षण कायम ठेवलं आहे.