प्रशासनाच्या कारवाईनंतरही रेतीमाफिया बेफान

शर्मिला वाळुंज
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात बेकायदा रेतीउपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे सहा कोटी रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. प्रशासनाकडून होणाऱ्या या कारवाईला न जुमानता रेतीमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून यांत्रिक पद्धतीने रेतीउत्खनन करून पर्यावरणास हानी पोहोचविण्याचे काम रेतीमाफियांकडून सुरूच आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात बेकायदा रेतीउपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे सहा कोटी रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. प्रशासनाकडून होणाऱ्या या कारवाईला न जुमानता रेतीमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून यांत्रिक पद्धतीने रेतीउत्खनन करून पर्यावरणास हानी पोहोचविण्याचे काम रेतीमाफियांकडून सुरूच आहे.

मुंब्रा खाडीकिनारी सात ते आठ बोटींद्वारे हा रेतीउपसा सध्या सुरू आहे. महसूल विभागाकडून कारवाई होऊनही प्रशासनाची पाठ फिरताच हे रेतीमाफिया सक्रिय होत असल्याने ही कारवाई केवळ कागदोपत्री असते का, असा सवाल पर्यावरणप्रेमी करीत आहेत. 

ठाण्यात महाविकास आघाडी देणार भाजपला धक्का?

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली परिसरातील खाडीकिनारी बेकायदा रेतीउपसा करण्याचे प्रमाण मोठे आहे. जानेवारी महिन्यात महसूल विभागाकडून जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील तानसा नदीसह मुंब्रा पारसिक, कळवा रेतीबंदर, काल्हेर रेती बंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडीपात्र, टेंभा आदी खाडी-नदीकिनारी सक्‍शन पंपाच्या मदतीने बेकायदा रेतीउपशावर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली.

या कारवाईत 344 सक्‍शन पंप व 23 बार्ज नष्ट करण्यात आल्या, तसेच 330 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. तसेच रेती साठविण्यासाठी बांधण्यात आलेले हौद जमीनदोस्त करण्यात आले होते. या कारवाईला महिना होत नाही तोच रेतीमाफियांनी आपल्या बोटी पुन्हा खाडीत उतरवून प्रशासनाला आव्हान दिले आहे. 

ठाणेकर अनुभवताहेत वैशाख वणवा

सध्या मुंब्रा खाडीत सात ते आठ बोटींद्वारे रेतीउपसा सुरू आहे. यांत्रिकपद्धतीने हे उत्खनन सुरू असल्याने पर्यावरणाला मोठी हानी पोहोचण्याचा धोका संभवतो. स्थानिकांनी सातत्याने विरोध करूनही खाडी परिसरात हे प्रकार सुरू असल्याचे उघड आहे. केवळ एक दिवस कारवाई केल्यानंतर प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष या माफियांच्या पथ्थी पडत आहे. प्रशासन केवळ कागदावर दाखविण्यासाठी कारवाई करते, त्या कारवाईला कोणीही जुमानत नसल्याचेही पर्यावरणप्रेमी सांगतात. 

५ वर्षांत ३८ आरोपींना अटक 
खाडीतील गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर ठाणे तहसीलदारांच्या पथकाद्वारे धडक कारवाई सुरू असते. तरीही, लपूनछपून रेतीमाफिया सक्रिय होत आहेत. मागील पाच वर्षात प्रशासनाने एकूण ९२० प्रकरणामध्ये १२८ गुन्हे दाखल केले असून ३८ आरोपीना अटक केली आहे.या कालावधीत एकूण २९ कोटींच्या आसपास दंडवसुली करण्यात आली.

बेकायदा रेती उपसा करणाऱ्या वर कारवाई सुरूच आहे. मुंब्रा खाडी परिसरात बेकायदा रेती उपसा सुरू असेल तर त्याची दखल घेत लवकरच कारवाई करण्यात येईल.
- मुकेश पाटील,  रेतीगट तहसीलदार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand mafia unfurls despite administration's action