मुंब्रा खाडीत रेती उपसा जोमाने 

शर्मिला वाळुंज
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पावसाने उडवलेली दाणादाण, भरतीमुळे खाडीला आलेले उधाण याचा धसका घेत रेती माफियांनी गेल्या आठवड्यात अनधिकृत रेती उपशाला विश्रांती दिली होती. मात्र, सोमवारनंतर पावसाचा जोर हळहळू कमी झाल्याने मंगळवारपासून (ता. ६) माफियांनी आपल्या बोटी खाडीत उतरवून पुन्हा जोमाने रेतीउपसा सुरू केल्याचे समोर आले.

ठाणे : पावसाने उडवलेली दाणादाण, भरतीमुळे खाडीला आलेले उधाण याचा धसका घेत रेती माफियांनी गेल्या आठवड्यात अनधिकृत रेती उपशाला विश्रांती दिली होती. मात्र, सोमवारनंतर पावसाचा जोर हळहळू कमी झाल्याने मंगळवारपासून (ता. ६) माफियांनी आपल्या बोटी खाडीत उतरवून पुन्हा जोमाने रेतीउपसा सुरू केल्याचे समोर आले.

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उपसा करणाऱ्या रेती माफियांनी निसर्गापुढे मात्र हार मारल्याचे चित्र दोन-तीन दिवस दिसून आले. शुक्रवार रात्रीपासून शहर, खाडी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. धो-धो पडणारा पाऊस, भरतीमुळे खाडी परिसराला आलेले उधाण, जलमय झालेला शहर परिसर आदी सर्व गोष्टी पाहता रेती माफियांनी आपल्या लहान-लहान बोटी मुंब्रा खाडी किनारी लावल्याचे दिसून आले.

पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा या बोटी खाडी परिसरात रेती उपसा करण्यासाठी उतरल्याचे दिसून आले. पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कारवाईसाठी खाडीत उतरत नाहीत. त्यामुळे रेती माफिया हीच संधी साधू लागले आहेत. मात्र, याला आवर घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

प्रशासनाकडून सूट
पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव हवामान खात्याकडून समुद्रातील नौका तसेच मच्छीमार बोटींना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जातो. हाच इशारा खाडी परिसरातील नौकांनाही असतो. परंतु, या इशाऱ्याला न जुमानता मुंब्रा, दिवा खाडी परिसरात सहा ते सात बोटी उतरवित सक्‍शन पंपाच्या सहायाने रेती उपसा केला जातो. जिल्हा प्रशासनानेही रेती माफियांना सूट दिली का काय, असा प्रश्‍न पडतो. जिल्हा प्रशासनाकडून किरकोळ कारवाई होत असल्याने रेती माफियाही बेफान झाले आहेत. 

रेल्वे मार्गाला धोका
रेती उपशामुळे एकीकडे खाडीचे पात्र धोक्‍यात आले असताना दुसरीकडे यामुळे खाडीला समांतर असणाऱ्या मध्य रेल्वे मार्गालाही धोका निर्माण होत आहे. रेल्वे मार्गालगतच हा रेती उपसा केला जात असल्याने जमीन खचून मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand upstream in Mumbra Bay