कल्पना सत्यात उतरवली तरच जगाचा कायापालट- वासलेकर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - कल्पनांवर विचार करा. त्या सत्यात उतरवा. तसे ध्येय उराशी बाळगून वाटचाल केलीत तरच जगाचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक संदीप वासलेकर यांनी रविवारी (ता.27) येथे केले.

मुंबई - कल्पनांवर विचार करा. त्या सत्यात उतरवा. तसे ध्येय उराशी बाळगून वाटचाल केलीत तरच जगाचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक संदीप वासलेकर यांनी रविवारी (ता.27) येथे केले.

यिनच्या जिल्हाप्रमुखांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात वासलेकर यांनी आपले विचार मांडले. अत्यंत व्यग्र असतानाही वासलेकर थेट अमेरिकेहून एक महत्त्वाची परिषद आटोपून खास यिनच्या कार्यशाळेत महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. वासलेकर यांनी तरुणांना सुरुवातीला काही प्रश्‍न विचारले. त्यांच्या उत्तरांतून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींविषयीची विद्यार्थ्यांना असलेली माहिती आणि त्यांचे त्याविषयीचे आकलन जाणून घेतले.

वासलेकर म्हणाले, की कल्पनांवर विचार करायला लागा. जगातले सर्व बदल आणि स्थित्यंतरे ही अशा कल्पनांमधूनच झाली आहेत. आदिमानवाने दगडावर दगड घासला. त्यातून ऊर्जेची निर्मिती झाली. अग्नीचा शोध लागला. गुहेच्या बाहेर रेघोट्या मारताना त्याला चित्रकलेचा शोध लागला. गुणगुणण्यातून गायनाने जन्म घेतला.
आधुनिक भौतिक शास्त्राचा जनक आईनस्टाईनने केलेल्या विचारातून जगाला ई बरोबर एमसी वर्ग (E=mc2) या समीकरणाचा शोध लागला. त्यातून जग बदलल्याचे उदाहरण देऊन वासलेकर यांनी, "कल्पना व विचार सत्यात उतरवण्यासाठी ध्येयाची एकाग्रता आणि मेहनतीची गरज असल्याचे तरुणांच्या मनावर बिंबवले.

मार्कांपेक्षा कल्पना श्रेष्ठ
इतरांपेक्षा आपण वेगळा विचार करायला हवा. जग बदलण्याची ताकद आपल्यात आहे. या बळावर तुम्ही जगात अत्युच्च शिखर गाठू शकता, असे मार्गदर्शन करताना वासलेकर यांनी स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ""मी डोंबिवलीत लहानाचा मोठा झालो. मराठी माध्यमात शिकलो. ऑक्‍स्फर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेलो. मी माझे मार्क्‍स तेथे सांगितले नाहीत. तुम्हाला माझे विचार मान्य असतील तर माझ्या मार्कांचा अट्टहास कशासाठी? माझ्या या सडेतोड युक्तिवादानंतर माझी निवड झाली. जगभरातून तीन हजार अर्ज आले होते. म्हणून तुम्ही गुणांपेक्षा कल्पनांना व तर्कांना महत्त्व द्या.

गरजेएवढाच पैसा कमवा
वासलेकर म्हणाले, की आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी मी काही चौकटी आखून घेतल्या होत्या. जितकी गरज आहे तितकाच पैसा कमवायचा. उगाचच पैशांच्या मागे धावायचे नाही. पैशांचे जाळे स्वतःभोवती तयार होता कामा नये. त्यात एकदा गुरफटला की तुम्ही वेगळे असे काही करू शकत नाही. काही तरी वेगळे करणे आणि पैसा कमावणे या दोन्ही गोष्टी समांतर आहेत. मी अमकं तमकं मिळवल्यावर हे करीन, असे नाही.

तुम्ही स्वबळावर एखाद्या देशाचे पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रपती यांच्यापेक्षाही जास्त मोलाची कामगिरी करू शकता, असा आत्मविश्‍वास त्यांनी यिनच्या तरुणांमध्ये जागवला.

Web Title: Sandip Waslekar speech in YIN programme