सांगलीचे व्यवस्थापन प्रवीण परदेशी पाहणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसाहाय्य तातडीने वितरित करा, तसेच उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सांगलीतील पूर परिस्थितीत व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई - पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसाहाय्य तातडीने वितरित करा, तसेच उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सांगलीतील पूर परिस्थितीत व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली आहे. परदेशी यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विश्वासू अधिकाऱ्याची निवड या मोहिमेवर केली आहे. 

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये एटीएमची व्यवस्था पूर्ववत केली जावी यासाठी रिझर्व्ह बॅंक आणि एसबीआयला राज्य सरकारने विनंती केली आहे. 

मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे, आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर उपस्थित होते.

बाधित नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बाधित गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli District management Pravin Pardeshi Devendra Fadnavis