कोरोनातून खबरदारी; ठाण्यातील 'या' भागात सार्वजनिक शौचालयाबाहेर बसवले सॅनिटायझर मशीन

कोरोनातून खबरदारी; ठाण्यातील 'या' भागात सार्वजनिक शौचालयाबाहेर बसवले सॅनिटायझर मशीन

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरातील दाटीवाटीच्या भागात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याची बाब निर्दशनास येत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून, ठाणे पूर्व भागातील पारशीवाडी येथील हनुमान मित्र मंडळातील युवकांनी पुढाकार घेत, सार्वजनिक शौचालय बाहेर सॅनिटायझर मशीन बसवून नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. युवकांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून 'ग्रीन झोन'मध्ये असलेल्या कोपरी विभागात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. कोपरीतील कोळीवाडा, आनंदनगर, ठाणेकरवाडी, पारशीवाडी आदी परिसर हे दाटीवाटीचे आहेत. या भागातही कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. या ठिकाणी राहणारे बहुतांश नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. 

हीच बाब ध्यानात घेऊन पारशीवाडी परिसरातील हनुमान मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी स्वखर्चातून शौचालयांच्या बाहेर सॅनिटायझर मशीन बसविली आहे. सॅनिटाझरचा वापर नागरिकांनी करावा याकरिता बॅनर लावून जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.
तसेच आपल्या परिसरात या संकटाच्या काळात नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, याकरिता वैयक्तिकरित्या नागरिकांशी संवादही साधला जात आहे. तसेच नागरिकांना उपाययोजना करण्याबाबत माहिती देण्यात येत आहे. 

मंडळाचे कार्यकर्ते ठरताहेत 'रुग्णमित्र'
मागील तीन महिन्याच्या कालावधीत पारशीवाडी भागातील कोणी व्यक्ती आजारी पडल्यास, त्या व्यक्तीला पालिकेच्या मदतीने वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य मंडळाचे कार्यकर्ते करतात. मंडळाचे अध्यक्ष महेश आंचेकर आणि शैलेश सोनावळे यांच्या मार्गदशनाखाली या मंडळाचे तरुण कार्यकर्ते येथील नागरिकांना सतत मदतीचा हात देत असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com