कुरण विकास प्रकल्पावर माती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

दहिसर नदीपात्रात भिंतीचे काम सुरू केल्यावर उद्यान प्रशासनाने गाळ, माती मॅप्टो फॅक्‍टरीतील जवळपास सर्वच भागांत टाकली आहे. कुरण विकास प्रकल्पाच्या जागेवरच ही माती का टाकली? यामुळे जैवविविधतेचे नुकसान होत आहे. 
- देबी गोएंका, पर्यावरणतज्ज्ञ 

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तृणभक्षक प्राण्यांसाठी चार वर्षांपूर्वी राबवलेल्या कुरण विकास प्रकल्पावर अक्षरश: माती पडली आहे. उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीपात्रातील भिंतीच्या बांधकामांसाठी काढलेली माती या प्रकल्पातील गवतावर टाकल्याने तृणभक्षक प्राण्यांच्या आहारावरच माती टाकल्याची टीका होत आहे. 

उद्यानातील नदीपात्रातील गाळ चांगल्या दर्जाच्या गवतावर टाकल्याने कुरण विकास प्रकल्पच धोक्‍यात आला आहे. उद्यानातील हरीण, सांबार आदी तृणभक्षक प्राण्यांना जंगलात चांगल्या दर्जाचे गवत मिळावे म्हणून हा प्रकल्प राबवण्यात आला. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दीड किलोमीटरवर असलेल्या जुन्या मॅप्टो फॅक्‍टरी परिसरात उद्यान प्रशासनाने हे काम हाती घेतले. जवळपास चार एकर जागेत हे काम करण्यात आले. यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने उद्यान प्रशासनाला सहकार्य केले होते. या उजाड जागेवर चांगल्या दर्जाच्या गवताची पेरणी केल्यानंतर वर्षभरात या भागांत तृणभक्षक प्राण्यांची संख्याही वाढल्याचे निरीक्षण वनाधिकाऱ्यांनी नोंदवले होते. हरणांची वाढती संख्या लक्षात घेता उद्यानातील बिबट्यांनाही पुरेसे खाद्य निर्माण झाल्याने हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे उद्यान प्रशासनाने जाहीर केले होते. 

कुरणावर माती टाकल्याबाबत उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

दहिसर नदीपात्रात भिंतीचे काम सुरू केल्यावर उद्यान प्रशासनाने गाळ, माती मॅप्टो फॅक्‍टरीतील जवळपास सर्वच भागांत टाकली आहे. कुरण विकास प्रकल्पाच्या जागेवरच ही माती का टाकली? यामुळे जैवविविधतेचे नुकसान होत आहे. 
- देबी गोएंका, पर्यावरणतज्ज्ञ 

 

Web Title: sanjay gandhi national park borivali issue